

Sanjay Raut on Mumbai Mayor
मुंबई : "पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा मुंबईवर ताबा घेण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे ते भाजपचाच महापौर करतील. अडीच-अडीच वर्ष महापौर असं काही होणार नाही," असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज (दि. २७) माध्यमांशी बोलताना केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा मुंबई महापालिकेवर थेट ताबा मिळवण्याचा प्रयत्न असल्याचे सांगत राऊत यांनी शिंदे गटावरही जोरदार टीका केली. “भाजप आपल्या ताकदीवरच महापौरपद मिळवणार आहे. शिंदे गटाला यात विशेष काही मिळणार नाही,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
संजय राऊत यांनी शिंदे गटावर बोचरी टीका करताना म्हटले की, “शिंदे गटासाठी बाळासाहेब ठाकरे वंदनीय नाहीत, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा वंदनीय आहेत.”शिवसेना शिंदे गटाला महापालिकेच्या सत्तेत फारसे काही मिळणार नसल्याचा दावा करत, “एखादी साडी-चोळी मिळवून समाधान मानावे लागेल,” असा टोला त्यांनी लगावला.