

Sanjay Raut on Surya Kant- Eknath Shinde Meeting
मुंबई : " गेल्या साडेतीन वर्षांपासून 'शिवसेना कोणाची', हा खटला सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत हे 'तारीख पे तारीख' देत आहेत. शनिवारी (दि. २४) ते मुंबईत आले होते. प्रोटोकॉलनुसार त्यांच्या स्वागतासाठी त्या विभागाच्या सचिवांनी जाणे अपेक्षित होते, मात्र राजकीय लोक त्यांच्या स्वागताला गेले. ताज पॅलेसमध्ये भेट मिळावी म्हणून एकनाथ शिंदे तिथे बराच वेळ होते. शिवसेना पक्ष-चिन्हांचा खटला सुरू असताना सूर्य कांत यांनी एकनाथ शिंदेंची भेट घेणे चूक आहे. न्यायमूर्ती सूर्य कांत यांना राजकारणात यायचे आहे, म्हणून हे सगळे करत आहेत, असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज (दि. २५) माध्यमांशी बोलताना केला.
संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले की, "न्यायमूर्ती सूर्यकांत शनिवारी मुंबईत आले होते. प्रोटोकॉलनुसार विभागाच्या सचिवांनी त्यांचे स्वागत करणे अपेक्षित होते, मात्र राजकारणी तिथे स्वागताला गेले. ताज पॅलेसमध्ये ही भेट व्हावी म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बराच वेळ तिथे थांबले होते. न्यायमूर्ती सूर्यकांत 'तारीख पे तारीख' देत आहेत आणि दुसरीकडे ज्यांचा खटला सुरू आहे त्यांच्याशीच गाठीभेटी घेत आहेत. जर हे असेच सुरू राहिले, तर न्यायव्यवस्थेवरचा उरलासुरला विश्वासही उडून जाईल."
"उशिराने मिळालेला न्याय म्हणजे न्याय नाकारण्यासारखेच आहे; पण केवळ न्याय नाकारला जात नाही, तर अशाने न्यायाचा विनाश (किंवा अंत) होतो." असे सूर्य कांत यांनी शनिवारी सांगितले. आम्ही तेच म्हणत आहोत. शिवसेना चिन्ह आणि पक्षाबाबत निर्णय अजून झाला नाही. न्यायमूर्ती सूर्य कांत यांना राजकारणात यायचे आहे, म्हणून हे सगळे करत आहेत, असा आरोपही राऊत यांनी केला.
"प्रत्येकाला देशांतर्गत फिरण्याचा, नोकरी करण्याचा अधिकार दिला आहे, हे आम्हालाही माहीत आहे. इतर राज्यांची भवने नवी मुंबईत उभारण्यात आली आहेत. हा देश सर्वांचा आहे; पण बिहारचे मंत्री अशोक चौधरी यांनी आव्हानाची भाषा केली. त्यांना आपली भाषा अधिक सौम्य करता आली असती. वातावरण खराब करू नका," असे आवाहन करत, "मुंबईत बिहार भवन बांधण्यासाठी जमीन पाटण्यावरून आणणार का?" असा सवाल संजय राऊत यांनी केला.
मुंबईत बिहार भवन बांधायचे आहे, तर सर्वपक्षीय बैठक घ्या. सर्वांना सांगा, "मी मुंबईत बिहार भवनसाठी जागा देतो आणि पाटण्यामध्ये आम्हाला ५ एकर जागा द्या. आम्हालाही तिथे ३० माळ्यांची इमारत बांधायची आहे." ही सांस्कृतिक देवाणघेवाण आहे. "मुंबईत जागा हवी असेल, तर गौतम अदानींकडून घ्या बाजारभावाने," असा टोलाही त्यांनी लगावला.
भाजप नेते मंगलप्रभात लोढा यांच्यावर निशाणा साधताना राऊत म्हणाले की, "रुग्णालयांवरील ब्रिटिशकालीन नावे बदलण्याची भाषा केली जाते, पण लोढा यांच्या कंपनीने त्यांच्या प्रकल्पांना 'ट्रम्प टॉवर' अशी परदेशी नावे दिली आहेत. महाराष्ट्र हा मराठी माणसाने आपल्या घामातून घडवला आहे, हे विसरू नका," असा इशाराही त्यांनी दिला.