

Sanjay Raut on BJP Aaid Event : भारतीय जनता पक्ष हा कोणताही अधिकृत राजकीय पक्ष नसून तो केवळ एक "पेड इव्हेंट" आहे, असा सणसणीत टोला लगावत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. पुण्यात आयोजित 'Gen Z' च्या कार्यक्रमावर सत्ताधाऱ्यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेताना राऊत यांनी 'लाडकी बहीण' योजनेपासून ते शालेय पोषण आहारातील भ्रष्टाचारापर्यंतच्या मुद्द्यांवरून सरकारची खरडपट्टी काढली.
पुण्यात पार पडलेल्या तरुणांच्या मेळाव्याला सत्ताधाऱ्यांनी 'पेड इव्हेंट' असे संबोधले होते. यावर बोलताना राऊत म्हणाले, "विद्यार्थी आणि तरुणांचा हा थेट अपमान आहे. आमचे कार्यक्रम पेड इव्हेंट असतील, तर मते विकत घेण्यासाठी सुरू केलेली 'लाडकी बहीण' योजना काय आहे? बिहारमध्ये दिलेले पैसे आणि भाजपचे सर्व कार्यक्रम हाच खरा पेड इव्हेंट आहे."
राऊत यांनी यावेळी आंबेगावच्या घटनेचा दाखला दिला. "शाळेत कुकरच्या शिट्या देऊनही न शिजणारा निकृष्ट, प्लास्टिकसारखा वाटाणा मुलांना दिला जात आहे. हा प्रकार उघडकीस आणणाऱ्या शिक्षिकेवर निलंबनाची कारवाई केली जाते. फडणवीसांनी हा वाटाणा घरी नेऊन वहिनीसाहेबांना शिजवायला सांगावा," असा टोला त्यांनी लगावला. पोषण आहाराचे कंत्राट नागपूरच्या भाजपधार्जिण्या ठेकेदारांना दिल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.
"मुंबईत येऊन अमित शहा यांनी नागरी सहकारी बँकांसाठी 'अम्ब्रेला बँक' म्हणून काम करणाऱ्या एका नॉन-बँकिंग फायनान्स कंपनीचे उद्घाटन केले. सहकार क्षेत्रातील लोकांशी कोणतीही चर्चा न करता ही निर्णयप्रक्रिया राबवण्यात आली आहे.महाराष्ट्रातील सहकार चळवळ संपवण्याचा अमित शहांचा कट", असा आरोही त्यांनी केला.
महाराष्ट्राची ओळख असलेली सहकार चळवळ आणि नागरी बँकांचे अस्तित्व संपवून गुजरातच्या दावणीला बांधण्याचा हा प्रयत्न असून, याविरोधात अमित शहा यांना पत्र लिहिल्याची माहितीही राऊत यांनी दिली. "राज्याची एवढी मोठी संपत्ती सहकाराच्या नावाखाली लुटली जात असताना राज्यातील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बेनडोकांसारखे टाळ्या वाजवत स्वागत करत आहेत," अशी बोचरी टीका त्यांनी केली.