

" आकाशवाणी आमदार निवासातील कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा पश्चाताप हाेत नाही. माझ्या जीवाशी जो खेळेल, त्याला मी सोडणार नाही, त्याला पुन्हा असंच उत्तर मिळेल," असा इशारा शिवसेना (शिंदे गट) आमदार संजय गायकवाड यांनी आज दिला. मुंबईतील आकाशवाणी आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये निकृष्ट दर्जाच्या जेवणावरून झालेल्या मारहाण प्रकरणी ते माध्यमांशी बोलत होते.
यावेळी संजय गायकवाड म्हणाले की, "मी गेल्या १५ वर्षांपासून कामानिमित्त मुंबईत येत आहे. नेहमीप्रमाणे मी आकाशवाणी आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये जेवणाची ऑर्डर दिली. मात्र, जेवणाचा पहिला घास तोंडात घेताच मला तीव्र मळमळ जाणवली. अन्नाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचे माझ्या लक्षात आले. मी तात्काळ संबंधित कर्मचाऱ्याला जाब विचारला आणि लोकांच्या जीवाशी असा खेळ करू नका, असेही सुनावले."
आमदार गायकवाड यांनी कॅन्टीनच्या कंत्राटावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, "आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये जेवण स्वस्त मिळत असल्याने दररोज सुमारे १० हजार लोक, ज्यात शासकीय अधिकारी, कर्मचारी, आमदार आणि राज्यभरातून आलेले शेतकरी यांचा समावेश असतो, येथे जेवतात. धक्कादायक बाब म्हणजे, गेल्या ३० वर्षांपासून एकाच कंत्राटदाराला हे कंत्राट दिले जात आहे. कोणत्या अधिकाऱ्याच्या आशीर्वादाने हा प्रकार सुरू आहे, याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. आपण 'आहार' समितीच्या अध्यक्षांना फोन करून माहिती दिली असल्याचेही त्यांनी सांगितले.
यापूर्वीही या कॅन्टीनमध्ये १५ दिवस आधीच्या तारखेची अंडी वापरली जात असल्याचा आरोप करत हात जोडून, विनंती करूनही समोरची व्यक्ती ऐकत नसेल आणि लोकांच्या आरोग्याशी खेळत असेल, तर त्याला शिवसेना स्टाईलनेच उत्तर द्यावे लागेल, असा इशारा संजय गायकवाड यांनी दिला.
या मारहाण प्रकरणावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेलाही आमदार गायकवाड यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, "माझ्यावर टीका करणाऱ्या संजय राऊत यांनी आठवावे की, दिल्लीत खासदार राजन विचारे यांनी जेवण चांगले न मिळाल्याने एका कर्मचाऱ्याच्या तोंडात जबरदस्तीने पोळी कोंबली होती. त्यामुळे त्यांनी आम्हाला शिकवू नये."
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनानिमित्त बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड हे मुंबईतील आकाशवाणी आमदार निवासात वास्तव्यास आहेत. मंगळवारी रात्री त्यांनी आपल्या रूम नंबर १०७ मधून जेवणाची ऑर्डर दिली. मात्र, त्यांना देण्यात आलेले जेवण, विशेषतः डाळ, अत्यंत निकृष्ट दर्जाची होती आणि तिला एक प्रकारचा वास येत होता. त्यांनी तातडीने कॅन्टीनमध्ये जाऊन व्यवस्थापकाला जाब विचारला.ही डाळ खाल्ल्यानंतर आपल्या पोटात मळमळू लागल्याचेही त्यांनी सांगितले. कॅन्टीनच्या एका कर्मचाऱ्याला थेट ठोसा लगावला. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
या प्रकारानंतर आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीनमधील जेवणाच्या दर्जाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आमदार निवासातच जर आमदारांना अशा प्रकारचे निकृष्ट जेवण मिळत असेल, तर सामान्य माणसांचे काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये मिळणाऱ्या निकृष्ट जेवणाबाबतचा प्रश्न आपण विधानसभेत उपस्थित करणार असल्याचेही संजय गायकडवाड यांनी स्पष्ट केले आहे.