

MLA Sanjay Gaikwad Assault Canteen Worker
मुंबई : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासाठी मुंबईत मुक्कामी असलेल्या शिवसेनेच्या (शिंदे गट) आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी आमदार निवासातील कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केली. जेवणामध्ये निकृष्ट दर्जाची आणि वास येणारी डाळ दिल्याच्या रागातून हा प्रकार घडला. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित (व्हायरल) झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान, या मारहाणीच्या प्रकारावर आपल्याला कोणताही पश्चाताप नाही, असेही त्यांनी आज सकाळी माध्यमांशी बोलताना सांगितले.
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनानिमित्त बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड हे मुंबईतील आकाशवाणी आमदार निवासात वास्तव्यास आहेत. मंगळवारी रात्री त्यांनी आपल्या रूम नंबर १०७ मधून जेवणाची ऑर्डर दिली. मात्र, त्यांना देण्यात आलेले जेवण, विशेषतः डाळ, अत्यंत निकृष्ट दर्जाची होती आणि तिला एक प्रकारचा वास येत होता. त्यांनी तातडीने कॅन्टीनमध्ये जाऊन व्यवस्थापकाला जाब विचारला.ही डाळ खाल्ल्यानंतर आपल्या पोटात मळमळू लागल्याचेही त्यांनी सांगितले. कॅन्टीनच्या एका कर्मचाऱ्याला थेट ठोसा लगावला. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
या प्रकारानंतर आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीनमधील जेवणाच्या दर्जाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आमदार निवासातच जर आमदारांना अशा प्रकारचे निकृष्ट जेवण मिळत असेल, तर सामान्य माणसांचे काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये मिळणाऱ्या निकृष्ट जेवणाबाबतचा प्रश्न आपण विधानसभेत उपस्थित करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
दोन दिवसांपूर्वीच त्यांनी ठाकरे बंधूंच्या (उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे) विजयी मेळाव्यावर एक वादग्रस्त विधान केले होते. त्यावरून मोठा वाद निर्माण झाल्यानंतर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली होती. आता कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आल्याने ते पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
शिवसेना उबाठाच्या नेत्या व मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी संजय गायकवाड यांनी केलेल्या मारहाणीचा निषेध केला आहे. तीन वर्षांपूर्वी आम्ही उठाव केला अशी भाषा करणार्यांकडून नेहमीच कायदा हातात घेतला जात आहे. गोरगरीबाला मारहाण केली जात आहे. निकृष्ट जेवण दिल्यामुळे मारहाण हे अतिरेकी कृत्य आहे. तुम्ही अतिरेकी झाला आहोत का, असा सवाल करत केवळ माझा लाडका कॅन्ट्रॅक्टरच हवा या भावनेतून झाली आहे. प्रत्येक ठिकाणी आपल्या लाडक्या कॉन्ट्रॅक्टरला काम मिळावे या भावनेतच मारहाण करण्यात आली. संपूर्ण राज्याला वेठीस धरले आहे, असा आरोप किशोरी पेडणेकर यांनी केला.