

Sandeep Deshpande MNS: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे धडाडीचे नेते संदीप देशपांडे हे मनसेमध्ये नाराज असून ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार अशा चर्चांना गेल्या काही दिवसांपासून ऊत आला होता. मात्र आता संदीप देशपांडे यांनी याच्यावर पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला आहे. यावेळी त्यांनी मनसेने तुम्हाला युतीच्या प्रक्रियेत डावलले का या प्रश्नाचं देखील उत्तर दिलं.
संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेत नाराजीच्या चर्चा अफवा आहेत अफवा पसरवू नका असं सांगितलं. त्यांना पत्रकारांना तुम्ही मनसेमध्ये नाराज आहात का असं विचारलं असता देशपांडेंनी तुम्हाला मी नाराज दिसतोय का असा प्रतिप्रश्न केला.
याचबरोबर देशपांडे यांनी मी पूर्णपणे मनसेचाच असल्याचं देखील स्पष्ट केलं. ते म्हणाले की, 'गेल्यावेळी राज ठाकरेंनी मला सर्वांना डावलून तिकीट दिलं होतं. त्यावेळी मी त्यांना विचारलं नाही की या सर्वांना डावलून मलाच का तिकीट दिलं म्हणून. एखाद्या प्रक्रियेत मी नसेन तर मी त्यांना का विचारी की मी या प्रक्रियेत का नाही आणि ते का आहेत?' संदीप देशपांडे पुढे म्हणाले, तो पक्षाचा निर्णय आहे तो मी मान्य केला पाहिजे.
संदीप देशपांडेंना त्यांचे अत्यंत निकटवर्तीय संतोष धुरी यांनी तिकीट नाकारल्यावर भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळी त्यांनी बोलताना मनसेचा अजून एक मोठा नेता नाराज असल्याचं सुतोवाच दिलं होतं. त्यानंतर संदीप देशपांडे हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली.
दरम्यान, पत्रकार परिषदेवेळी संदीप देशपांडे यांना मनसेत संदीप आणि संतोष ही जय वीरूसारखी जोडी म्हणून ओळखली जाते. त्यातील वीरू भाजपमध्ये गेल्याबाबत आणि मनसेला गळती लागल्याबद्दल संदीप देशपांडेंना प्रश्न विचारण्यात आला, त्यावेळी त्यांनी, 'युती म्हटल्यावर ज्या काही वाटाघाटी होतात त्यात १०० टक्के मसाधान कोणाचंच होत नसतं. ना त्यांच्याकडे ना आमच्याकडे कोणी १०० टक्के समाधानी असणार. हा या प्रक्रियेचा एख भागच आहे तो सर्वांनी मान्य केला पाहिजे.
ते पुढे म्हणाले, आम्ही पहिल्यांदाच युती केली त्यामुळं आमच्यासाठी या सर्व गोष्टी नवीन आहेत. या गोष्टींची सवय आम्हाला नाही. कार्यकर्त्यांचे मन थोडे विचलीत होत असावं. आम्ही त्यांच्याशी चर्चा करतोय. काहीजण समजून घेत आहेत काही जणांनी समजून घेतलेलं नाही.