

Samruddhi Highway has made traffic faster but also increased accidents
मुंबई : राजन शेलार
वाहतूक जलदगतीने होण्यासाठी उभारण्यात आलेला समृद्धी महामार्ग, वाढते अपघात आणि त्यात होणाऱ्या मृत्यूंमुळेच चर्चेत आहे. डिसेंबर २०२२ पासून सप्टेंबर २०२५ पर्यंत या तीन वर्षात महामार्गावर ४२३ अपघात झाले असून त्यात ३८५ जणांचा मृत्यू झाल्याचे ताज्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
विशेष म्हणजे, जानेवारी ते सप्टेंबर २०२५ या नऊ महिन्यांच्या काळात मागील वर्षाच्या तुलनेत अपघातांमध्ये तब्बल २६ टक्के वाढ झाल्याचे चिंताजनक चित्र समोर आले आहे. ७०१ कि.मी. लांबीचा समृद्धी महामार्ग हा मुंबई आणि नागपूर यांसारख्या दोन मुख्य शहारांना जोडला गेला आहे. वर्धा, अमरावती, वाशिम, बुलडाणा, जालना, छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि ठाणे हे १० जिल्हे, २६ तालुके आणि जवळपास ३९२ गांवामधून हा समृद्धी महामार्ग जातो. तथापि, सरळ व लांब असलेल्या या महामार्गावर वाहनचालकांचे वाहनांवर नियंत्रण नसल्याचे दिसून येते. त्यामुळेच समृद्धी महामार्गावरील रस्ते अपघातांची संख्या सातत्याने वाढत असल्याचे ताज्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.
अपघातांची ही आहेत प्रमुख कारणे
समृद्धी महामार्ग हा हाय-स्पीड एक्सप्रेस वे असल्याने वेगमर्यादा न पाळणे, टायर फुटणे, चालकांचा थकवा, ओव्हरटेक करताना निष्काळजीपणा, रात्री वाहन चालवताना दक्षतेचा अभाव, वाहन तांत्रिक तपासणीचा अभाव ही कारणे अपघातांना पूरक ठरत आहेत. समृद्धी महामार्ग हा हाय-स्पीड एक्सप्रेस वे असल्याने या महामार्गावर स्पीड मॉनिटरिंग प्रणाली, कॅमेऱ्यांची संख्या वाढवणे आणि वेग नियंत्रणासाठी कठोर दंडाची अंमलबजावणी तसेच वाहतूक विभाग व शासनाने नियमांचे कडक पालन, सतर्कता मोहिमा आणि गती नियंत्रण तंत्रज्ञान वाढविण्याची गरज आहे.
२०२३ : एकूण १३४ अपघात नोंदवले गेले होते. यामध्ये ८१ गंभीर अपघातामध्ये १५१ प्रवाशांचा मृत्यू झाला २०२४: अपघाताची संख्या वाढून १३७ वर पोहोचली. त्यामध्ये ९६ गंभीर अपघातामध्ये १२६ जणांचा बळी गेला.
या दोन वर्षांच्या तुलनेत गंभीर जखमी अपघातांमध्ये
३५ टक्के वाढ तर किरकोळ जखमी अपघातांमध्ये
५८ टक्के घट नोंदवली गेली आहे.
२०२५ मधील चिंताजनक वाढ
जानेवारी ते सप्टेंबर २०२४ दरम्यान समृद्धीवर १०४ अपघातांमध्ये ९२ जणांचा मृत्यू झाला होता. मात्र, यंदा फक्त जानेवारी ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत अपघातांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत १०४ वरून १३१ झाली असून १०७ जणांचा (१६ टक्के वाढ) मृत्यूची नोंद झाली आहे.