

नवी मुंबई ः नवी मुंबइतील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी महापालिका प्रशासनाने पुन्हा एकदा मोहीम हाती घेतली आहे. वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी सर्व विभागांच्या कार्यकारी अभियंत्यांची तातडीची बैठक घेऊन सुरू असलेल्या कामांना वेग देण्याचे आणि पुढील 15 दिवसांत खड्डेमुक्तीची सर्व कामे पूर्ण करून तसा सविस्तर अहवाल सादर करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.
बैठकीदरम्यान आयुक्तांनी नागरिकांकडून मिळणाऱ्या तक्रारी, सोशल मीडियावरील प्रतिक्रियांचा आढावा तसेच स्वतःच्या पाहणीदरम्यान लक्षात आलेल्या त्रुटींची सविस्तर चर्चा केली. अनेक मुख्य मार्गांसह अंतर्गत रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य वाढले असून यामुळे दैनंदिन प्रवासात नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी नमूद केले.
परतीच्या पावसामुळे मागील काही आठवड्यांत अनेक ठिकाणी रस्त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ही स्थिती तातडीने सुधारण्यासाठी अभियंता विभागांना क्षेत्रनिहाय प्राधान्यक्रम ठरवून दुरुस्ती आणि पुनर्वसनाची कामे युद्धपातळीवर करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच, ऑनलाईन आणि प्रत्यक्ष माध्यमातून येणाऱ्या नागरिकांच्या तक्रारी तातडीने नोंदवून त्यावर जलदगतीने उपाययोजना कराव्यात, असे स्पष्ट निर्देशही आयुक्त शिंदे यांनी दिले. कामात कोणताही विलंब किंवा निष्काळजीपणा आढळल्यास संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.