

मुंबई : मुंबई महानगरपालिकेत नियुक्त करण्यात येणारे नामनिर्देशित म्हणजेच स्वीकृत नगरसेवकही महापौर, उपमहापौर वगळता अन्य समित्यांचे अध्यक्ष बनू शकतात. यासाठी राज्याच्या नगर विकास विभागामार्फत कायद्यात बदल करण्यात येणार असल्याचे समजते. त्यामुळे मागच्या दाराने येणाऱ्या नगरसेवकांनाही अध्यक्षपदासाठी दावा करता येणार आहे.
मुंबई महानगरपालिकेमध्ये आता दहा स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती केली जाणार आहे. सध्या स्वीकृत नगरसेवकांना निवडून आलेल्या नगरसेवकांप्रमाणे अधिकार नाहीत. स्वीकृत नगरसेवक मतदानामध्येही भाग घेऊ शकत नाही किंवा तो एखाद्या समितीचा अध्यक्षही होऊ शकत नाही. त्यामुळे हे पद मुंबई महापालिकेमध्ये शोभेचे पद बनले आहे. यासाठी या पदाला जादा अधिकार देण्यासंदर्भातील मागणी गेल्या काही वर्षांपासून केली जात आहे.
विधान परिषदमध्ये असलेल्या सदस्याला मुख्यमंत्रीसह, उपमुख्यमंत्री, मंत्री आदी पदावर विराजमान होता येते. एवढेच काय तर त्यांना मतदानाचा अधिकारही आहे. याच धर्तीवर स्वीकृत नगरसेवकांनाही अधिकार हवा आहे. राज्याच्या नगर विकास विभागानेही याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे येणाऱ्या महापालिकेत स्वीकृत नगरसेवकही अध्यक्ष बनला तर नवल वाटायला नको.
स्वीकृत सदस्य म्हणून ज्येष्ठ व अभ्यासू माजी नगरसेवकांसह काही सामाजिक संस्थांमधील तज्ज्ञांची नियुक्ती केली जाणार आहे. ज्याचा फायदा त्या पक्षाला होणार आहे. यातील काही जणांना समिती अध्यक्षपद मिळाल्यास स्वीकृत नगरसेवक पदाला महत्त्व प्राप्त होणार आहे. परंतु यासाठी नगर विकास विभागाला सध्याच्या पालिका अधिनियमांमध्ये बदल करावा लागणार आहे. हा बदल झाल्यानंतर अधिसूचना काढून नवीन नियम अमलात येतील. त्यानंतर स्वीकृत नगरसेवकाला विविध समित्यांचे सदस्य पद, समिती अध्यक्षपद व मतदानाचा अधिकार देण्यात येणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.