

मुंबई : मुंबईत भाजपने महापौरपदावर दावा केला असला तरी हॉटेल पॉलिटिक्सद्वारे काहीतरी वेगळे पदरात पाडून घेण्याचा मिंधेचा प्रयत्न आहे. त्यांना स्थायी समितीत जास्त रस आहे. कारण सर्व आर्थिक व्यवहार तेथून होत असून ठेकेदारी, कंत्राट, टेंडर असे घोटाळे करण्याची संधी असलेल्या पदांमध्ये त्यांना जास्त रस आहे, असा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर केला.
मुंबईचा महापौर कोण होणार यावरून भाजप आणि शिंदे गटामध्ये सुरू असलेल्या वादावर खासदार संजय राऊत पत्रकारांशी बोलत होते. महापौर महायुतीचाच होणार, असा दावा दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून होत असेल तर मग सौदेबाजी का सुरू आहे? नगरसेवकांना लपवून ठेवणे, दुसऱ्या पक्षाचे नगरसेवक फोडणे, विकत घेण्याचा प्रयत्न करणे, आमिषे, दबाव दाखवणे, असे प्रकार का सुरू आहेत? असा सवाल त्यांनी केला.
पैसा आणि दहशतीच्या जोरावर इतर पक्षांच्या उमेदवारांना माघार घेण्यास लावत बिनविरोध उमेदवार निवडून आणणे आणि मतदारांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवणे, हा मतदारांचा विश्वासघात आहे, असेही राऊत म्हणाले. दरम्यान, कल्याण-डोंबिवलीतील आमच्या त्या दोन नगरसेवकांवर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याचेही राऊत यांनी सांगितले. दरम्यान, चंद्रपूरमध्ये अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. तिथे आमच्या मदतीशिवाय कोणाचीही सत्ता स्थापन होऊ शकत नाही. एका बाजूला काँग्रेस आणि दुसऱ्या बाजूला भाजप आहे, असे राऊत म्हणाले.