

Rohit Pawar on Delimitation Bill Row : मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाच्या विरोधात पक्षाच्या सर्व खासदारांनी मतदान करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पक्षाच्या कार्याध्यक्षा आणि खासदार सुप्रिया सुळे यांना पत्राद्वारे केली आहे. भाजप केवळ आपल्या राजकीय फायद्यासाठी हे विधेयक मंजूर करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी या पत्रात केला आहे. रोहित पवार यांनी सुप्रिया सुळे यांना लिहिलेले हे पत्र सोशल मीडियावर शेअर केले आहे.
आपण अत्यंत अस्वस्थतेने आणि वेदनेने हे पत्र लिहित असल्याचे नमूद करत रोहित पवारांनी लिहिलं आहे की, "आपले नेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेब प्रकृती अस्वास्थ्यामुळे कोणताही धोरणात्मक निर्णय घेण्याच्या स्थितीत नाहीत. त्यांनी गेली सहा दशकं फुले-शाहू-आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांची जी कास धरली, स्व यशवंतराव चव्हाण साहेबांचा समतावादी आणि लोकशाहीवादी विचार जपला ते केवळ राजकारण नव्हतं तर त्यांचं आयुष्यभराचं तप होतं. आज साहेब आजारी असताना, त्यांच्यामागं घेतल्या जाणाऱ्या या निर्णयामुळे त्यांच्या आयुष्यभराच्या या तपाचा भंग होऊ नये, हीच माझी अत्यंत प्रामाणिक भावना आहे."
साहेबांच्या निष्ठेवर आणि पुरोगामी प्रतिमेवर कोणताही डाग लागू न देण्याची जबाबदारी आज आपल्या सर्वाच्याच खांद्यावर आहे. आपल्या पक्षातील काही खासदार आणि आमदार सत्तेसोबत जाण्याचा विचार करत असल्याने किंवा काहींना सत्तेसोबत जाण्यास भाग पाडलं जात असल्याने त्यांचा आपल्यावर दबाव असणं स्वाभाविक आहे, पण ज्यांना जायचं असेल त्यांना खुशाल जाऊ द्या. त्यांचे खरे चेहरे देखील समोर येऊ द्या. कुणी गद्दारी करणार असेल तर असे गद्दार आमदार, खासदार इथली स्वाभिमानी जनता पुन्हा कदापि निवडून देणार नाही. कोणताही निर्णय घेताना केवळ खासदार, आमदार यांचं मत महत्त्वाचं नसतं तर पक्षासाठी निवडणुकीत रात्रंदिवस झटणारे लाखो कार्यकर्ते, पदाधिकारी, मतदार, विचार आणि नागरिकांची भावना देखील तेवढीच महत्वाची असते. त्याचा देखील विचार होणं गरजेचं आहे, असेही रोहित पवारांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
मला आमदार आणि खासदारांनाही सांगायचंय की, दबावापुढे झुकून संविधानाशी द्रोह करणार नाही, हे तुम्हीही हिंमत करुन दाखवून द्या. यासंदर्भात तुम्हालाही भूमिका स्पष्ट करावी लागेल. धाडस दाखवावं लागेल. आपला पक्ष लोकशाहीचा आदर करणार आहे. त्यामुळे उघड मतं मांडावीत. पण आपण डोळे झाकले म्हणजे लोकांचं लक्ष आपल्याकडं नाही, असं कुणीही समजू नये. आपण ठाम भूमिका घेतली तर ज्यांनी तुम्हाला निवडून दिलं त्याचा विश्वासघात होणार नाही, शिवाय त्याचे प्रश्नही बाजूला सरणार नाहीत. पण मागील काही काळात राज्याच्या राजकारणातून सर्वसामान्य जनता हस्वली असून दुर्दैवाने राजकारणाच्या केंद्रस्थानी केवळ सत्ता, पैसा आणि नेते आले आहेत. यामुळंच आजवरच्या सर्वांत महाभयंकर अशा दुष्काळासारख्या प्रश्नावरचं लक्ष देखील बाजूला गेलं, परिणामी सामान्य जनता प्रचंड अडचणीत आली. त्यांचा आवाज कोण मांडणार? याचा आपल्याला अत्यंत गांभीर्याने विचार करावा लागेल, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
आज महाराष्ट्राच्या मनात या विधेयकाविरुद्ध प्रचंड रोष आहे. राज्यातील सामान्य जनतेच्या भावना आणि देशातील लोकशाहीसमोरील आव्हानं पाहता, आपण या विधेयकाच्या बाजूने उभं राहणं हे आपल्या विचारांशी प्रतारणा ठरेल. वैयक्तिकरित्या माझा या डिलिमिटेशन विधेयकाला ठाम विरोध असून राज्यातील लाखो कार्यकत्यांची देखील हीच भावना आहे. म्हणूनच, तुमच्यातील संवेदनशील मनाला साद घालण्यासाठी एक सहकारी आणि कुटुंबातील सदस्य म्हणून मी आपणास नम्र विनंती करतो की, उद्या संसदेत मांडल्या जाणाऱ्या डिलिमिटेशन विधेयकाच्या विरोधात आपण सर्वांनी मतदान करावं इतकंच नाही, तर आपण या विधेयकाच्या विरोधात आहोत, ही स्पष्ट भूमिका आजच जाहीर करून साहेबांवर प्रेम करणाऱ्या राज्यातील लाखो अस्वस्थ कार्यकर्त्यांना आणि पुरोगामी जनतेला विश्वास द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
पक्षाच्या दिल्लीतील सर्व घडामोडी आपणच नेहमी मीडियासमोर मांडत असतात त्यामुळे या विधेयकाला पाठिंबा देण्याबाबतच्या सध्या सुरु असलेल्या चर्चा बघितल्या तर आपल्याला देखील त्यासाठी जबाबदार धरलं जातंय दुसरीकडं तुमचा चेहरा पुढे करुन खऱ्या अर्थाने यामागे असलेला आपल्याच पक्षातील भाजपचा हस्तक नेता मात्र शांतपणे बसला असून आपली प्रतिमा मात्र खराब होतेय आदरणीय ताई, मी तुमच्या डोळ्यातली भावना बघितलीय, तुमच्या मनात देखील आमच्याप्रमाणेच विचार आहे पण तुमच्यावर दबाव येत असावा शेवटी आपण स्वाभिमानी महाराष्ट्रातील मराठी माणसं आहोत. त्यामुळं दबाव झुगारून धाडस दाखवावंच लागेल. या सर्व बाबी लक्षात घेऊन साहेबांच्या विचारांचा वारसा अखंड ठेवण्यासाठी आपण या विधेयकाला विरोध करण्याचा निर्णय नक्की घ्याल, असा मला विश्वास आहे. आपला एक निर्णय आदरणीय साहेबांच्या विचारांचा सन्मान राखेल आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानालाही बळ देईल, असा विश्वासही रोहित पवारांनी पत्राच्या शेवटी व्यक्त केला आहे.