

मुंबई: मुंबई आणि परिसरातील हवा पुन्हा एकदा बिघडली आहे. सर्वच प्रमुख एक्यूआय स्टेशन्सचा आढावा घेतल्यास तब्बल 45 स्टेशन्सचा हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) दीडशेपार असल्याचे दिसून आले. 151 ते 200 दरम्यानचा एक्यूआय म्हणजे आरोग्यासाठी घातक हवेची पातळी असते.
मुंबईच्या सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांकामध्ये (एक्यूआय) मंगळवारच्या तुलनेत बुधवारी (151-121) मोठी वाढ झाली. प्रमुख एक्यूआय स्टेशन्सचा एक्यूआय दीडशेपार गेला. त्यात विक्रोळी ( एक्यूआय 172), स्वस्तिक पार्क (169), वडाळा ट्रक टर्मिनल (164), पवई/सर्वोदय नगर (161), सुभाष नगर/वाळकेश्वर (158), कुर्ला (157), चेंबूर (156), भांडुप/चांदिवली (155), चारकोप (154), अंधेरी, पूर्व (153) आणि अणुशक्तीनगरचा (152) समावेश आहे.
मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये किमान तापमान विशीखाली कायम आहे. सांताक्रुझ वेधशाळेमध्ये बुधवारी किमान 19 आणि कमाल 30 अंश सेल्सिअस तापमान होते. मंगळवारच्या (18/29 अंश सेल्सिअस) त्यात प्रत्येकी एका अंशाने वाढ झाली. गुरुवारपासून तापमानात वाढ अपेक्षित आहे. पुढील दोन दिवसांमध्ये किमान तापमान विशीपार जाण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) वर्तविला आहे.