

मुंबई : घड्याळ, साडी व आता गाडीवर लावण्यात आलेले लाल निळे दिवे, यावरून झालेल्या टीकेमुळे महापौर रितू तावडे चांगल्याच संतापल्या आहेत. नागरी प्रश्नांवर चर्चा करण्याऐवजी अशा किरकोळ मुद्द्यांवर राजकारण करणाऱ्या शिवसेना ठाकरे गटाला मुंबईकरांनी म्हणूनच विरोधी बाकावर बसविले, अशी संतप्त प्रतिक्रिया हा महापौरांनी व्यक्त केली.
सतत होत असणाऱ्या टीकेमुळे अखेर महापौर रितू तावडे यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेत शिवसेना ठाकरे गटावर निशाणा साधला. मुंबई शहराच्या विकासावर चर्चा करण्यापेक्षा किरकोळ मुद्द्यांना महत्त्व देत टीका केली जात आहे. महापालिकेने महापौर म्हणून दिलेल्या गाड्यांवरील लुकलुकणाऱ्या दिव्यांच्या वादावरही त्यांनी स्पष्टीकरण दिले. महापौर पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर प्रशासनाने दिलेले कार्यालय, वाहन आणि अन्य सुविधा आपण स्वीकारल्या असून गाडीवर दिवे बसवण्याची कोणतीही मागणी आपण केलेली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गाडीवर दिवे बसवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाचा आहे. या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर प्रशासनाशी चर्चा करून संबंधित दिवे काढून टाकण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले. शहरातील नालेसफाई, स्वच्छता मोहीम, हॉस्पिटल व शाळांच्या सुविधा यांसारख्या महत्वाच्या विषयांवर चर्चा व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
मुंबई शहर व उपनगरात गॅस सिलिंडरचा तुटवडा असल्याचीही विरोधकांकडून टीका केली जात आहे. मात्र मुंबईत गॅस सिलिंडरचा तुटवडा नाही. सिलिंडर बुकिंग केल्यानंतर एक सिलिंडर असलेल्या नागरिकाला तो 25 दिवसात मिळतो. तर दोन सिलेंडर असलेल्या नागरिकांना तो 42 दिवसात मिळावा असे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे सिलेंडर तुटवडा असल्याचे सांगत मुंबईकरांना संभ्रमात टाकू नका, असा सल्ला यावेळी महापौर यांनी शिवसेना ठाकरे गटाला दिला.
मुंबईतील रोहिंग्या व बांग्लादेशी फेरीवाल्यांवर कारवाई, फुटपाथ स्वच्छता आणि अनधिकृत बांधकामांवर कठोर भूमिका घेतल्यामुळे विरोधक अस्वस्थ झाले आहेत. त्यामुळे मुंबईकरांचे लक्ष विचलित करण्यासाठी गाड्यांवरील लुकलुकणाऱ्या दिव्यांचा मुद्दा उचलला जात असल्याचा आरोप सभागृह नेते गणेश खणकर यांनी केला.
गाड्यांवर लावलेल्या दिव्यांबाबत आम्ही कुणावर टीका केली नाही. वर्तमानपत्रात आलेल्या बातम्यांवर प्रतिक्रिया दिली. प्रशासनाने दिवे लावून दिले तर असे महापौर सांगत असतील तर, दिवे लावणाऱ्या अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांवर कोणती कारवाई केली याचे स्पष्टीकरण करावे, असे मत विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केले.