Tuljapur Drugs Case | ड्रग्ज प्रकरणावरून आ. राणाजगजितसिंह यांचे खा. सुळे यांना सडेतोड प्रत्युत्तर
भीमाशंकर वाघमारे धाराशिव :
तुळजापूर येथील भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार विनोद गंगणे हे शहरात गाजलेल्या ड्रग्ज प्रकरणात आरोपी असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या खा. सुप्रिया सुळे यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिल्यानंतर भाजपचे तुळजापूरचे आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी बुधवारी (दि. १०) आक्रमक पण मुद्देसूदपणे खा. सुळे यांना प्रत्युत्तर दिले आहे.
विशेष म्हणजे आ. पाटील हे पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे माजी मंत्री असून खा. सुळे यांचे नातेवाईकही आहेत. साधारण सहा ते सात महिन्यांपूर्वी तुळजापूर येथे ड्रग्ज तस्करीचे प्रकर उघडकीस आले. त्यानंतर पोलिसांनी हे प्रकरण खणून काढले. यात अनेकजण ड्रग्ज तस्करी, सेवन या प्रकरणात आरोपी झाले.
त्यांच्यावर सध्या जिल्हा न्यायालयात खटलाही सुरु आहे. तुळजापूरचे भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार विनोद गंगणे यांच्यावरही या प्रकरणात खटला दाखल आहे. ड्रग्ज प्रकरणात ते आरोपी असूनही भाजपने त्यांना उमेदवारी देऊन एका आरोपीला अभय दिले असल्याची टिका करीत विरोधकांनी रान उठविले आहे. त्यातच माजी नगराध्यक्ष संतोष परमेश्वर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्यावरही ड्रग्ज प्रकरणात आरोप आहेत.
खा. सुळे यांनीही हा प्रकार लक्षात आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून अशा आरोपींना पाठीशी न घालण्याचे आवाहन केले होते. भाजपच्या दुटप्पीपणावर निशाणाही साधला होता.
खा. सुळे यांची ही टीका लक्षात घेत राणाजगजितसिंह पाटील यांनी बुधवारी सोशल मीडियावरून विस्तृत पत्र प्रसिद्ध केले. आपल्या पत्रात त्यांनी अत्यंत संयत पण ठाम शब्दांत सुळे यांच्या वक्तव्यांवर नाराजी व्यक्त केली. त्यांनी लिहिले की,
“अजितदादा आणि सुनेत्राताई जशा माझ्या जवळच्या नातेवाईक आहेत, तशाच आपणही माझ्या थोरल्या बहिणीप्रमाणे आहात. पण टीका करताना तुळजापूरसारख्या तीर्थक्षेत्राची बदनामी होईल याचाही विचार करायला हवा होता.”
ते पुढे म्हणाले की, खा. सुळे यांनी ज्या पद्धतीने सलग दोनदा तुळजापूरच्या ड्रग्ज प्रकरणाबाबत वक्तव्ये केली, त्यामागील सत्य तपासण्याचा प्रयत्न त्यांनी केला नाही. त्यामुळे हे वक्तव्य मीडिया ट्रायल निर्माण करण्यासाठी राजकीय हेतूने केले गेले असल्याचे दिसून येते, असेही राणांनी सूचित केले.
या प्रकरणात गंगणे यांची भूमिका स्पष्ट करताना आ. पाटील म्हणाले की,
“ड्रग्ज प्रकरणाची माहिती मिळताच मी स्वतः पोलिस अधिकाऱ्यांना कल्पना दिली. गंगणे यांनी पोलिसांना महत्त्वाची माहिती देत संपूर्ण प्रकरण उघड करण्यास मदत केली. तरीदेखील त्यांनाच आरोपी करण्यात आले, ही खरोखर दुर्दैवाची गोष्ट आहे.”
या मागील इतिहास सांगताना त्यांनी एक मोठा मुद्दाही उपस्थित केला.
“संतोष परमेश्वर यांच्यावरही त्याच प्रकरणात आरोप आहेत. पण ते आरोपी होईपर्यंत ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. त्या वेळी त्यांच्यावर कारवाई का झाली नाही?”
असा थेट सवाल राणा पाटील यांनी सुळे यांना केला.
यामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. पवार–पाटील परिवारातील नाते, राजकीय भूमिका आणि बदलती समीकरणे पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली आहेत. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.

