

कळंब नगरपालिकेच्या निवडणुकीत दररोज नवे राजकीय वारे वाहत आहेत. कोण कोणासोबत येणार, कोण कोणापासून दूर जाणार यावर संपूर्ण तालुका दिवसेंदिवस ताटकळत बसला आहे. आता अखेर सगळ्या अंदाजांना पूर्णविराम देत दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र आले आहेत. दैनिक पुढारीने व्यक्त केलेला अंदाज तंतोतंत खरा ठरला आहे. या निर्णयामुळे कळंब नगरपालिकेतील लढत अधिकच रंगतदार व तिरंगी होणार हे निश्चित झाले आहे.
काल उशिरा रात्री कळंबमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष शिवाजी लकडे यांच्या पुढाकाराने महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष प्रा. श्रीधर भवर, तसेच दोन्ही गटांतील प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बराच विचारविनिमय झाल्यानंतर शेवटी जागा वाटपावर दोन्ही पक्षांनी मोहर उमटवली.
यात शरद पवार गटाला नगराध्यक्ष पदासह सहा नगरसेवकांच्या जागा तर अजित पवार गटाला चौदा जागा देण्यात आल्या. काही जागांमध्ये सुताराम बदल होण्याची शक्यता लकडे यांनी व्यक्त केली. तसेच शिक्षक आमदार विक्रम काळे हे पक्षाची अधिकृत कागदपत्रे (एबी फॉर्म) घेऊन आज येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
काही दिवसांपूर्वी भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यात युतीसाठी चर्चा झाली. मात्र भाजप-शिंदे गटाने “उमेदवार आमचे, चिन्ह तुमचे” असा प्रस्ताव मांडल्याने राष्ट्रवादी गटाने तो सरळ नाकारला. “आमचे उमेदवार आमचेच आणि चिन्हही आमचेच” ही भूमिका घेऊन तालुकाध्यक्ष शिवाजी लकडे आणि शहराध्यक्ष दत्ता तनपुरे यांनी ती चर्चा फिस्कटत असल्याचे स्पष्ट केले. या निर्णयामुळे राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाल्याचे तनपुरे यांनी सांगितले.
उबाठा शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्यातही प्राथमिक चर्चा झाली होती. मात्र नगराध्यक्ष पद शरद पवार गटाने मागितल्यामुळे स्थानिक स्तरावर आघाडीची समीकरणे विस्कटली. त्यामुळेच प्रा. श्रीधर भवर यांच्या पत्नी प्रा. डॉ. मीनाक्षी भवर यांनी स्वतःच प्रचार सुरू केला होता. अखेर या मतभेदांमुळे आघाडीची शक्यता पूर्णपणे संपुष्टात आली.
शिवसेना शिंदे गटाने माजी नगराध्यक्ष शिवाजी कापसे यांच्या पत्नी सुनंदा कापसे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. राष्ट्रवादीकडून प्रा. डॉ. मीनाक्षी भवर मैदानात उतरणार हे स्पष्ट झाले आहे. तर उबाठा शिवसेनेतून रश्मी मुंदडा किंवा महिला शहर प्रमुख धनश्री कवडे यांपैकी एकाची निवड होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिरंगी लढत निश्चित आहे. त्यातच एखादा सक्षम अपक्ष उमेदवार उतरला तर संपूर्ण राजकीय पट बदलण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
कळंब नगरपालिकेची निवडणूक नेहमीच चर्चेचा विषय असते. यंदा मात्र धडाधड बदलणाऱ्या राजकीय समीकरणांमुळे साऱ्या तालुक्याचे लक्ष या निवडणुकीवर खिळले आहे. पुढील काही दिवसांत संपूर्ण चित्र अधिक स्पष्ट होणार असून स्थानिक राजकारणात मोठे वळण येण्याची चिन्हे दिसत आहेत.