

मुंबई : कबुतरांमुळे माझ्या आईचा जीव गेला. कबुतरांच्या विष्ठेतील विषाणूंमुळे पसरणाऱ्या आजारामुळे तिचे निधन झाले. असह्य वेदना सोसाव्या लागणाऱ्या या आजारावर कोणतेच उपचार नसून देशात दरवर्षी नऊ लाख लोकांना याचा संसर्ग होतो. माझ्या आईच्या वाट्याला ज्या वेदना आल्या त्या इतरांच्या वाट्याला येऊ नयेत. त्यासाठी ही कबुतरे मानवी वस्तीपासून लांब, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात स्थलांतरित करावीत, अशी मागणी भाजप आमदार राम कदम यांनी मंगळवारी विधानसभेत केली.
मुंबईतील दादर येथील कबुतरखान्याचा प्रश्न काही महिन्यांपूर्वी वादात अडकला होता. कबुतरांमुळे आरोग्याला धोका निर्माण होतो, असा दावा करत तो बंद करण्यात आल्यामुळे जैन धर्मियांनी याविरोधात तीव्र आंदोलन पुकारले होते. या पार्श्वभूमीवर मंगळवारी विधानसभेत राम कदम यांनी आपल्या दिवंगत आईच्या आजारपणाचा दाखला देत कबुतरांमुळे होणाऱ्या आजारांचा मुद्दा मांडला.
राम कदम म्हणाले की, माझ्या आईचे १२ जून रोजी निधन झाले. तिला शेवटच्या दोन वर्षांत मरणासन्न यातना भोगाव्या लागल्या. माझ्या आईला फुप्फुसाचा 'आयएलडी' (इन्टरस्टिशियल लंग डिसीज) हा आजार झाला होता, ज्याला जगात औषध नाही.
हा अत्यंत वेदनादायी आजार कबुतरांच्या विष्ठेतून पसरणाऱ्या विषाणूंमुळे बळावतो. माझ्या आईच्या बाबतीत जे घडले, ते यापुढे इतर कुणाच्याही आईसोबत घडू नये, म्हणूनच मी हा विषय विधानसभेत मांडत आहे,' असे भाजप आमदार राम कदम यांनी सांगितले. माझ्या आईला तिच्या शेवटच्या काळात २४ तास ऑक्सिजनवर राहावे लागले.
फुप्फुसांमधील फायब्रोसिस वाढू नये म्हणून केवळ जुजबी औषधे मिळत होती. आई पंधरा-पंधरा मिनिटे न थांबता खोकायची आणि खोकता खोकता बेशुद्ध पडायची, अशा असहाय्य वेदना तिने सहन केल्या. भारतात दरवर्षी तब्बल नऊ लाख रुग्ण या आजाराला बळी पडत असल्याची माहितीही राम कदम यांनी दिली.
कदम म्हणाले, कबुतरांना दाणे देणे रातोरात बंद करावे असे मला अजिबात म्हणायचे नाही, कारण दादरचा कबुतरखाना बंद केल्यामुळे तिथे अनेक कबुतरांचे जीव गेले होते आणि कबुतरांनाही जगण्याचा अधिकार आहे. परदेशात कबुतरांचे स्थलांतर आणि त्यांच्या जन्मावर नियंत्रण (बर्थ कंट्रोल) असे उपाय योजले जातात. मुंबईतील राष्ट्रीय उद्यानात ५० हजार एकरची विस्तीर्ण जागा उपलब्ध असल्याने तिथे आपण या कबुतरांचे सुरक्षित स्थलांतर करू शकतो, असेही ते म्हणाले.
राम कदम यांनी ही मागणी मांडल्यानंतर या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राज्य शासनाला यावर विचार करण्याचे निर्देश दिले. कबुतरांद्वारे पसरणाऱ्या फुप्फुसांच्या व्याधींविषयी सखोल अभ्यास करून योग्य ती उपाययोजना काढण्यासाठी तज्ज्ञांची एक विशेष समिती स्थापन करावी आणि त्यानुसार योग्य ती कार्यवाही करावी, असे निर्देश विधानसभा अध्यक्षांनी सरकारला दिले.
राम कदम खोटे बोलतात - जैन मुनी
दरम्यान, राम कदम यांनी विधानसभेत केलेल्या या दाव्यावर जैन मुनींनी आक्षेप घेतला असून यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. जैन धर्मगुरू निलेशचंद्र मुनी यांनी माध्यमांशी बोलताना राम कदम यांचे दावे फेटाळून लावत त्यांना आव्हान दिले. राम कदम हे खोटे बोलत आहेत. राम कदमांच्या आईचे निधन कबुतरांमुळेच झाले असेल, तर त्यांनी आधी त्याचे ठोस पुरावे द्यावेत. राम कदम यांच्या आईच्याच नाही तर जगातल्या प्रत्येकाच्या आईचा मुद्दा महत्त्वाचा असतो; त्यांनी आपल्या आईच्या मृत्यूचा असा विषय विधानसभेत मांडायला नको होता, असेही त्यांनी सांगितले.