

rape case bail hearing :
कोची : "एखाद्या विवाहित व्यक्तीने संमतीने ठेवलेले परस्त्रीशी संबंध जर कायद्याने गुन्हा ठरत नसतील, तर एका अविवाहित पुरुषाने अनेक महिलांशी संमतीने शारीरिक संबंध ठेवले तर त्यात गैर काय? केवळ याच कारणावरून त्याचा जामीन अर्ज का फेटाळला जावा?" असे सवाल केरळ उच्च न्यायालयाने आज (दि.२८) उपस्थित केले.आमदार राहुल मामकुटाथिल यांच्याविरुद्ध दाखल असलेल्या बलात्काराच्या गुन्ह्यातील अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी करताना न्यायमूर्ती कौसर एडप्पागथ यांनी हे निरीक्षण नोंदवले.
बार अँड बेंचने दिलेल्या रिपोर्टनुसार, राहुल मामकुटाथिल यांच्यावर सध्या लैंगिक शोषणाचे तीन गुन्हे दाखल आहेत. ताज्या प्रकरणात एका महिलेने आणि तिच्या कुटुंबाने थेट मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्याकडे तक्रार केली होती. बलात्कार केल्यानंतर सक्तीने गर्भपात करण्यास भाग पाडल्याचा दावा पीडितेने केला आहे. तसेच व्हिडिओ व्हायरल करण्याचीही आमदाराने धमकी दिल्याचे तिने फिर्यादीत म्हटलं होतं. दरम्यान, या गंभीर आरोपांनंतर काँग्रेस पक्षाने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये राहुल मामकुटाथिल यांचे सदस्यत्व निलंबित केले होते. त्यानंतर त्यांनी 'युथ काँग्रेस'च्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. मात्र, ते अद्याप पालक्कड मतदारसंघाचे आमदार म्हणून कार्यरत आहेत. तिरुवनंतपुरम सत्र न्यायालयाने मामकुटाथिल यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
सुनावणीदरम्यान सरकारी वकिलांनी युक्तिवाद केला की, मामकुटाथिल यांच्या विरोधात दाखल असलेले खटले हे केवळ संमतीने ठेवलेल्या संबंधांचे नसून, त्यामध्ये महिलांना धमकावणे आणि वारंवार अशा प्रकारचे गुन्हे करण्याचा कल दिसून येतो. "हा केवळ संमतीने ठेवलेले संबंध नंतर बिघडल्याचा प्रकार नाही," असाही दावा वकिलांनी केला.
न्यायालयाने नमूद केले की, कथित घटनेपूर्वी (१७ मार्च २०२५) आरोपी आणि तक्रारदार महिला संमतीने संबंधांमध्ये होते. घटनेनंतरही पीडिता स्वेच्छेने पालक्कडला गेली. तिथे दोन दिवस आमदारासोबत राहिली, असे तिच्याच जबाबातून स्पष्ट होते. न्यायमूर्तींनी स्पष्ट केले की, "व्हिडिओ रेकॉर्डिंगचा मुद्दा वेगळा असून तो स्वतंत्रपणे विचारात घेतला जाऊ शकतो. परंतु, बलात्काराच्या कलमांतर्गत (कलम ३७६) तपास करताना, सुरुवातीपासूनच्या संबंधांचा विचार करावा लागेल. एखादी घटना सुटी करून पाहता येणार नाही."
सध्या मामकुटाथिल यांना दोन गुन्ह्यांमध्ये जामीन मिळाला असून, तिसऱ्या गुन्ह्यातही आज सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केल्यामुळे त्यांची तुरुंगातून सुटका होण्याची शक्यता आहे. उच्च न्यायालयाने सध्याच्या जामीन अर्जावरील आपला निकाल राखून ठेवला आहे.