

मुंबई : लोढा डेव्हलपर्स लिमिटेडचे माजी संचालक राजेेंद्र लोढा यांना सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने गुरुवारी 85 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात औपचारिकपणे अटक केली. त्यांना 20 फेब्रुवारीपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली आहे.
याआधी राजेंद्र लोढा यांना मुंबई पोलिसांनी फसवणूक आणि बनावट कागदपत्रे तयार केल्याबद्दल गुन्हा नोंदवला होता. कंपनीची जमीन बेकायदेशीरपणे विकल्यामुळे तसेच हस्तांतरणीय विकास हक्क अर्थात टीडीआरमध्ये घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. राजेंद्र लोढा यांना सप्टेंबरमध्ये मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्यांना आतापर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.
राजेंद्र लोढा यांना कंपनीने जमीन खरेदी-विक्रीचे अधिकार दिले होते. पण या अधिकाराचात्यांनी गैरवापर केला. तसेच कंपनीचा निधी दुसरीकडे वळवला, असाही आरोप त्यांच्यावर आहे. बऱ्याच वर्षांपासून ते असे व्यवहार करत होते. मुंबई महानगरातील ठाणे, कल्याण, पनवेल या ठिकाणच्या जमिनींमध्येत्यांनी अनियमितता केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मुलगा साहील आणि जवळच्या सहकाऱ्यांच्या मदतीने राजेंद्र यांनी पैशांचा अपहार केल्याचेही या अधिकाऱ्यांनी सांगितले. राजेंद्र लोढा यांची 59 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.