Raj Thackeray: राज ठाकरेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना खरमरीत पत्र; 'मौन सोडा, बेफाम नेत्यांवर कठोर कारवाई करा'

Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खुले पत्र लिहून सत्ताधारी नेत्यांच्या वर्तनावर आणि मुख्यमंत्र्यांच्या मौनावर प्रश्न उपस्थित केले.
Raj Thackeray
Raj ThackerayPudhari
Published on
Updated on

Raj Thackeray Writes Strong Open Letter to Devendra Fadnavis: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून एक खुले पत्र लिहित राज्यातील सध्याच्या राजकीय वातावरणावर आणि सत्ताधारी नेत्यांच्या वर्तनावर कठोर शब्दांत टीका केली आहे. सत्तेचा गैरवापर, असंवेदनशील वक्तव्ये आणि चुकीच्या कृत्यांवर कारवाई होत नसल्याने महाराष्ट्राच्या राजकारणाची प्रतिमा मलिन होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

राज ठाकरे यांनी पत्रात म्हटले आहे की, केंद्रातील सत्ताधाऱ्यांमध्ये सत्तेचा अहंकार वाढल्याची भावना देशभरात निर्माण झाली आहे. मात्र आता त्याच प्रकारचा प्रभाव महाराष्ट्रातही दिसू लागल्याचे त्यांनी नमूद केले. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचे नेहमीच देशभर कौतुक होत आले, पण गेल्या काही वर्षांत ती परंपरा ढासळत असल्याची टीकाही त्यांनी केली.

राज ठाकरे यांनी एका आमदार आणि पक्ष पदाधिकाऱ्याचा थेट उल्लेख न करता, लोकांच्या मृत्यूवर हसल्याचा आरोप करत अशा प्रकारच्या वर्तनावर कठोर कारवाई न झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. अशा घटनांनंतरही सरकारकडून कोणतीही ठोस भूमिका घेतली जात नसल्यामुळे चुकीचा संदेश जात असल्याचे त्यांनी म्हटले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा सुसंस्कृत आणि संवेदनशील नेत्याची असल्याचे सांगताना, अशा घटनांवर त्यांचे मौन अनेक प्रश्न निर्माण करत असल्याचे राज ठाकरे म्हणाले. सत्ताधारी नेते किंवा मंत्री वादग्रस्त विधाने करत असतानाही त्यांच्यावर कोणतीही शिस्तभंगाची कारवाई होत नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

Raj Thackeray
UAPA Terrorists List: मोदी सरकारचा मोठा निर्णय! लष्कर-ए-तैयबा, जैशशी संबंधित 23 संशयित दहशतवादी 'आतंकवादी' घोषित

आपल्या ३७ वर्षांच्या राजकीय अनुभवाचा उल्लेख करताना राज ठाकरे यांनी सांगितले की, पूर्वी कोणत्याही पक्षाचा नेता चूक करत असेल, तर त्याला पक्षीय पाठबळ न देता त्याची चूक मान्य केली जात असे. बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, प्रमोद महाजन यांसारख्या नेत्यांच्या काळात राजकीय शिस्त आणि जबाबदारीची जाणीव होती, असेही त्यांनी पत्रात लिहिले आहे.

आज मात्र "आपला माणूस" म्हणून चुकीच्या वर्तनाकडे दुर्लक्ष करण्याची प्रवृत्ती वाढत असल्याची टीका करत त्यांनी यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात चुकीचे पायंडे पडत असल्याची चिंता व्यक्त केली.

पत्राच्या शेवटी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना थेट आवाहन केले आहे की, असंवेदनशील आणि बेफाम वर्तन करणाऱ्या लोकप्रतिनिधींवर कठोर कारवाई करून आवश्यक असल्यास त्यांचे राजीनामे घ्यावेत. तसेच, "फडणवीस चुकीचे वर्तन सहन करत नाहीत" हा संदेश स्पष्टपणे दिल्यास संपूर्ण राजकीय व्यवस्थेत शिस्त निर्माण होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

"तुम्ही सुज्ञ आहात, त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी योग्य निर्णय घ्याल, अशी अपेक्षा आहे," अशा शब्दांत राज ठाकरे यांनी आपल्या पत्राचा शेवट केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news