Raj Thackeray: फोडाफोडीचं राजकारण घाणेरडं; मोदींचा पत्ता सरकला तर भाजपचा बंगला कोसळेल; राज ठाकरेंची सडकून टीका

Raj Thackeray BJP Criticism: राज ठाकरे यांनी राज्य आणि देशातील फोडाफोडीच्या राजकारणावर कठोर टीका करत भाजपला भविष्यात याची किंमत मोजावी लागेल, असा इशारा दिला.
Raj Thackeray
Raj ThackerayPudhari
Published on
Updated on

Raj Thackeray BJP Criticism: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य आणि देशातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर कठोर शब्दांत टीका केली. पक्षफोड, नेत्यांची आयाराम-गयाराम संस्कृती आणि सत्तेसाठी सुरू असलेल्या राजकीय हालचालींवर भाष्य करत त्यांनी भाजपवर निशाणा साधला. सध्या सुरू असलेले राजकारण हे लोकशाहीसाठी धोकादायक असल्याचे सांगत, भविष्यात याचे परिणाम भाजपलाही भोगावे लागतील, असा इशारा त्यांनी दिला. ठाण्यातील सीकेपी सभागृहात पक्ष पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना राज ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

'फोडाफोडीचं राजकारण लोकशाहीसाठी घातक'

राज ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रात आणि देशात सध्या सुरू असलेले पक्षफोडीचे राजकारण अत्यंत चिंताजनक आहे. विरोधी पक्षातील नेते आणि लोकप्रतिनिधींना आपल्या बाजूला ओढण्याचा प्रयत्न हा लोकशाहीच्या मूल्यांना धक्का देणारा आहे. सत्ता कायमस्वरूपी कोणाकडेच राहत नाही, त्यामुळे आज निर्माण होत असलेली राजकीय पद्धत उद्या सत्ताधाऱ्यांनाच महागात पडू शकते, असे त्यांनी म्हटले.

त्यांनी टीका करताना असेही म्हटले की, "प्रश्न नेत्यांना विकत घेणाऱ्यांचा नाही, तर स्वतःला विकायला तयार होणाऱ्यांचा आहे. विकायला तयार असतील तर खरेदी करणारेही तयार असतात."

'विरोधक संपवण्याच्या प्रयत्नातून घरातच विरोधक तयार होतात'

राज ठाकरे यांनी इतिहासाचा दाखला देत सांगितले की, जगात अनेकदा सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना संपवण्याचा प्रयत्न केला, पण त्याच प्रक्रियेत त्यांच्या स्वतःच्या पक्षातच नवीन विरोधक निर्माण झाले. अखेरीस त्यांच्याच लोकांनी त्यांना आव्हान दिले. हीच प्रक्रिया आता भाजपमध्येही सुरू असल्याचा दावा त्यांनी केला.

आणीबाणीच्या काळाचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, अशा प्रकारच्या राजकीय प्रयोगांचे परिणाम इतिहासाने अनेकदा दाखवून दिले आहेत.

'भाजपचा आधार अजूनही नरेंद्र मोदी'

राज ठाकरे यांनी भाजपच्या नेतृत्वावरही भाष्य केले. त्यांनी पत्त्यांच्या बंगल्याचे उदाहरण देत म्हटले की, सध्याचा भाजप हा एका व्यक्तीभोवती केंद्रित झाला आहे.

"पत्त्यांच्या बंगल्यात खालचा पत्ता निघाला की संपूर्ण बंगला कोसळतो. भाजपची आजची स्थितीही तशीच आहे. पक्षाचा मुख्य आधार नरेंद्र मोदी आहेत. तो आधारच कमकुवत झाला, तर संपूर्ण रचना हादरेल," असे ते म्हणाले.

Raj Thackeray
Raj Thackeray: राम मंदिरातील गैरव्यवहारावर पंतप्रधानांचं मौन का? भक्तांच्या पैशांचा हिशेब कोण देणार? राज ठाकरेंचा सवाल

अमित शाह यांच्या राजकारणावरही निशाणा

राज ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही अप्रत्यक्ष टीका केली. विरोधी पक्षांतील नेत्यांना फोडून वेगवेगळे गट निर्माण करण्यामागे दीर्घकालीन राजकीय रणनीती असल्याचा आरोप त्यांनी केला.

त्यांच्या मते, विविध पक्षांतील नेत्यांना थेट भाजपमध्ये न घेता स्वतंत्र गट तयार करण्यामागे भविष्यातील राजकीय समीकरणांचा विचार असू शकतो.

'सत्तेचा अमरपट्टा कोणाकडेच नसतो'

राज ठाकरे म्हणाले की, कोणतीही सत्ता कायमस्वरूपी नसते. त्यामुळे सत्तेच्या जोरावर विरोधकांना कमकुवत करण्याचे प्रयत्न लोकशाहीसाठी घातक आहेत. आज जे घडत आहे, त्याचाच परिणाम भविष्यात सत्ताधाऱ्यांनाही भोगावा लागू शकतो.

राजकीय पक्षांनी पुढील पिढ्यांसमोर कोणता आदर्श ठेवायचा, याचाही विचार केला पाहिजे. राज्यात सध्या सुरू असलेले फोडाफोडीचे राजकारण हे सुसंस्कृत आणि प्रगल्भ राजकारणाचे लक्षण नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पश्चिम बंगाल आणि बिहारचाही केला उल्लेख

राज ठाकरे यांनी निवडणूक प्रक्रियेबाबतही भाष्य करत पश्चिम बंगाल आणि बिहारमधील घडामोडींचा उल्लेख केला. निवडणुकीच्या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय यंत्रणेचा वापर झाल्याचा आरोप करत त्यांनी या विषयावरही चिंता व्यक्त केली.

दरम्यान, राज ठाकरे यांच्या या वक्तव्यांमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे असून त्यांच्या टीकेला सत्ताधारी पक्षाकडून काय उत्तर दिले जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news