Raj Thackeray: '२० वर्षांच्या मुलाला....,' साहिल वाकोडे प्रकरणावर राज ठाकरेंचा संताप; विद्यार्थ्यांना काय आवाहन केलं?

Sahil Wakode IIT Bombay: विद्यार्थ्यांसाठी २४ तास मानसोपचारतज्ज्ञ, प्रभावी समुपदेशन आणि पारदर्शक तक्रार निवारण व्यवस्था उभी करण्याची मागणी राज ठाकरे यांनी केली आहे.
Raj Thackeray Sahil Wakode IIT Bombay
Raj Thackeray Sahil Wakode IIT BombayPudhari
Published on
Updated on

Raj Thackeray Sahil Wakode IIT Bombay: आयआयटी मुंबईतील साहिल वाकोडे प्रकरणावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाष्य केले आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर शिक्षण व्यवस्थेतील वाढता ताण, विद्यार्थ्यांवरील मानसिक दबाव आणि प्रकरणाला जातीय रंग देण्याच्या मुद्द्यावर त्यांनी चिंता व्यक्त केली.

साहिलने परीक्षेदरम्यान मोबाईल आणि चॅटजीपीटीचा वापर केल्याचा आरोप आयआयटी प्रशासनाकडून सुरुवातीला करण्यात आला होता. मात्र, तपास पूर्ण होण्यापूर्वी हा आरोप जाहीर करणे अयोग्य असल्याचे मान्य करत प्रशासनाने नंतर माफी मागितली. दुसरीकडे, साहिलच्या कुटुंबीयांनी जातीय छळाचे आरोप केले असून, या आरोपांप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे.

राज ठाकरे यांनी म्हटले की, विद्यार्थी परीक्षेत गैरप्रकार करत असेल तर त्याला रोखणे आणि नियमानुसार कारवाई करणे हे प्राध्यापकांचे कर्तव्य आहे. मात्र, आरोप सिद्ध होण्यापूर्वी मृत विद्यार्थ्याला दोषी ठरवणे योग्य नाही. त्याचप्रमाणे जातीय छळाचे आरोप झाले म्हणून तपास पूर्ण होण्यापूर्वी प्राध्यापकांनाही दोषी ठरवणे योग्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या संपूर्ण प्रकरणात सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, एका २० वर्षांच्या तरुणाला जीवन संपवण्याचा मार्ग का स्वीकारावा वाटला, यावर गांभीर्याने चर्चा होणे गरजेचे असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले. विद्यार्थ्यांवरील वाढता शैक्षणिक आणि मानसिक ताण, स्पर्धा आणि भविष्यातील अनिश्चितता या मूळ प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

“आयआयटी असो किंवा त्याआधीच्या स्पर्धा परीक्षा, या जीवघेण्या होत चालल्या आहेत. काहीशे जागांसाठी लाखो विद्यार्थी परीक्षा देतात. निवड झाल्यानंतर अभ्यासाचे ओझे असते. त्यानंतर कॅम्पस सिलेक्शन आणि भविष्यातील करिअरची चिंता असते,” असे राज ठाकरे यांनी म्हटले.

हा ताण केवळ आयआयटीच्या विद्यार्थ्यांपुरता मर्यादित नसल्याचेही त्यांनी सांगितले. कॉमर्स आणि आर्ट्सच्या विद्यार्थ्यांपासून डॉक्टर, इंजिनिअर आणि इतर क्षेत्रातील तरुणांपर्यंत अनेक जण मानसिक दबावाला सामोरे जात आहेत. त्यामुळे एका विद्यार्थ्याच्या मृत्यूकडे केवळ जातीय संघर्षाच्या चौकटीतून न पाहता संपूर्ण शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींवर प्रश्न उपस्थित करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले.

गेल्या ३० ते ४० वर्षांत शिक्षणाचे बाजारीकरण करण्याच्या प्रक्रियेत भारतीय शिक्षण व्यवस्थेचे मोठे नुकसान झाल्याचा आरोपही राज ठाकरे यांनी केला. या व्यवस्थेत आमूलाग्र बदल करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

Raj Thackeray Sahil Wakode IIT Bombay
Azamgarh Massacre: महामृत्युंजय जप सुरू होता, अचानक पिस्तूल निघालं; पत्नी, दोन पंडित अन् मुलाची हत्या, आजमगड हत्याकांडाची इनसाइड स्टोरी

दरम्यान, आयआयटी मुंबईतील विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी समुपदेशनाची व्यवस्था, २४ तास मानसोपचारतज्ज्ञांची उपलब्धता, तक्रारींचे पारदर्शकपणे निराकरण आणि शिस्तभंगाच्या कारवाईदरम्यान विद्यार्थ्यांवर अनावश्यक मानसिक दबाव येणार नाही, अशी व्यवस्था करण्याच्या मागण्या केल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची दिशा याच मूलभूत प्रश्नांवर केंद्रित राहावी, असे राज ठाकरे यांनी म्हटले.

“जात आणि धर्म हे विषय पुढे आणून मूळ प्रश्नांपासून विद्यार्थ्यांचे लक्ष विचलित होऊ नये. विद्यार्थ्यांमध्ये मनभेद आणि फूट निर्माण होईल, असे काही करू नका,” असे आवाहनही त्यांनी केले.

Raj Thackeray Sahil Wakode IIT Bombay
Vidyanand Bapat: विद्यानंद बापट निवडणुकीच्या मैदानात उतरणार? असीम सरोदे यांच्या पोस्टने राजकीय चर्चेला उधाण

शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी दूर करण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपला आवाज उठवत राहणे गरजेचे आहे. सरकार आणि प्रशासनानेही विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर उत्तर देऊन आवश्यक ती कृती करणे अपेक्षित आहे, असे राज ठाकरे यांनी म्हटले.

शेवटी साहिल वाकोडे याच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त करताना राज ठाकरे यांनी शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींवर काम करणे हीच साहिलसह तणावामुळे जीव गमावलेल्या विद्यार्थ्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे म्हटले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news