

Raj Thackeray On Campaign Rule: राज्यातील महानगर पालिका निवडणूक जाहीर प्रचाराची सांगता काल सायंकाळी ५ वाजता झाली. मात्र त्यानंतर निवडणूक आयोगानं नवीन परिपत्रक काढत उमेदवारांना मतदारांच्या वैयक्तिक भेटीगाठी घेण्याची परवानगी असेल असं सांगितल्यानं मोठा गोंधळ निर्माण झाला आहे.
त्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत टीका केली. तसेच त्यांनी निवडणूक आयोग यंदाच्या मतदान प्रक्रियेवेळी नवीन पाडू (PADU Machine EVM Backup) नावाचं मशिन वापरणार आहे. त्यावरून देखील राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे.
राज्यातील महानगर पालिका निवडणूक जाहीर प्रचार काल (१३ जानेवारी २०२६) सायंकाळी ५.३० ला संपला. त्यानंतर आज सकाळी उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या घरी भेटीसाठी गेले होते. ते तेथून मुंब्रादेवीच्या दर्शनाला जाणार अशी बातमी होती. मात्र राज ठाकरे यांनी थोडक्यात पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगाच्या कालच्या प्रचारासंदर्भातील नव्या नियमावरून टीका केली.
राज ठाकरे म्हणाले, 'निवडणुकीचा प्रचार ५ वाजता संपल्यानंतर दुसरा दिवस रिकामा अन् त्यानंतर मतदान ही प्रथा होती. मात्र निवडणूक आयोगानं नवीन नोटिफिकेशन काढलं की तुम्ही आज म्हणजे मतदानाच्या आदल्या दिवशी ५ वाजेपर्यंत मतादारांना भेटू शकता.'
'ही व्यवस्था विधानसभा आणि इतर निवडणुकांसाठी का नव्हती. त्यांनी ही मुभा का दिली. पत्रक वाटायचं नाही. मात्र पैसे वाटण्याची मुभा दिली आहे का? असा सवाल देखील राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला विचारला.
यानंतर राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगानं यंदाच्या महानगरपालिका निवडणुकीत एक PADU नावेचे नवीन मशिन आणलं आहे, त्याबाबत देखील भाष्य केलं. ते म्हणाले, 'निवडणूक आयोगानं पाडू नावाचे नवे मशिन आणलं आहे. नवीन मशीन इव्हीएमला लावणार आहेत. त्याची माहिती कोणत्याही राजकीय पक्षाला दिलेली नाही. हे मशिन काय आहे हे कोणालाच माहिती नाहीये.'
निवडणूक आयोग सतत नियम बदलत असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला. ते म्हणाले, 'निवडणुकीच्या तोंडावर रोज नियम बदलत आहेत. सरकारला जी गोष्ट हवी आहे ती करून देण्यासाठी निवडणूक आयोग आहे का?'
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना सतर्क राहण्याचा इशारा दिला. ते म्हणाले, आमच्याकडून कार्यकर्त्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले जात आहेत. पैसे कसे वाटले जात आहेत याचे रील व्हायरल होत आहेत. लोकं पैसे नाकारत आहेत. ही एक सकारात्मक बाब आहे. हरलेली निवडणूक पुन्हा कशी जिंकता येईल यासाठी हे सर्व सुरू आहे.'
राज ठाकरे यांनी राज्य निवडणूक आयुक्त वाघमारे यांच्यावरही उपरोधिक टीका केली. त्यांनी सरकारनं निवडणूक आयोगाचा 'वाघ' कधीच मारून टाकला आहे असे म्हणत जे जुने नियम आहेत ते आताच का बाहेर काढलेत असा सवाल देखील केला.