

EC Poll Campaigning Rules: राज्यातील महानगरपालिका निवडणुकीच्या जाहीर प्रचाराची तोफ थंडावल्यानंतर आता नियमावलीवरून नवा वाद उफाळून आला आहे. जाहीर प्रचाराची वेळ संपल्यानंतर मिरवणुका, रॅली आणि सभांवर बंदी असली, तरी उमेदवारांना घरोघरी जाऊन प्रचार करण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र, याच वेळी पत्रके वाटण्यास मज्जाव करण्यात आल्याने निवडणूक आयोगाच्या या विसंगत निर्णयावर काँग्रेसने जोरदार आक्षेप घेतला आहे.
प्रचाराच्या या विचित्र नियमावलीबाबत पत्रकारांनी राज्य निवडणूक आयुक्तांना प्रश्न विचारला असता, त्यांची मोठी तारांबळ उडाली. "प्रचाराच्या वेगवेगळ्या कॅटेगरी आहेत, साडेपाच नंतर सभा-रॅली बंद होतील पण घरोघरी जाता येईल," असे उत्तर देताना आयुक्त वाघमारे भांबावलेले दिसले. हा जुनाच नियम असल्याचा दावा त्यांनी केला, परंतु पत्रके वाटण्यास बंदी आणि वैयक्तिक भेटींना परवानगी यातील विसंगती त्यांना स्पष्ट करता आली नाही.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर पोस्ट करत निवडणूक आयोगाच्या भूमिकेचा कडाडून निषेध केला आहे. ते म्हणाले की, "एकाच वेळी प्रचार बंद आणि प्रचार सुरू असे आदेश देणे म्हणजे आचारसंहितेचा उघड उघड खेळखंडोबा आहे. घरोघरी जाऊन मते मागणे हा प्रचार नाही का? की आता प्रचाराची व्याख्या निवडणूक आयोगाच्या सोयीप्रमाणे बदलली आहे?"
सपकाळ यांनी पुढे म्हटले की, अशा अर्थहीन सूचनांमुळे राजकीय पक्ष, उमेदवार आणि प्रशासन सर्वच संभ्रमात पडले आहेत. हा केवळ नियमांचा गोंधळ नसून निवडणूक आयोगाची विश्वासार्हता धुळीस मिळवण्याचा प्रकार आहे. "अशा दुटप्पी आदेशांमुळे लोकशाही उपहासाचा विषय बनत आहे. आयोगाने आपली भूमिका स्पष्ट करावी की नेमका प्रचार संपला आहे की सुरू आहे?" असा जळजळीत सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
या गोंधळामुळे निवडणुकीच्या शेवटच्या ४८ तासांत मैदानात असलेल्या उमेदवारांमध्ये चिंतेचे वातावरण असून, प्रशासनाकडून कारवाईची टांगती तलवार कायम आहे.