

Why Raj Thackeray not invited to Shiv Sena UBT Dasara rally?
मुंबई : मृणालिनी नानिवडेकर
शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना हजर राहणार का? या चर्चेवर पडदा पडणार असून, या पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांना निमंत्रण देण्यात येणार नसल्याचे स्पष्ट झाले. पक्षाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी, हा आमच्या पक्षाचा मेळावा आहे, मनसे हा वेगळा पक्ष असल्याने राज ठाकरे यांना मेळाव्याला बोलावले जाण्याची शक्यता काही दिवसांपूर्वी फेटाळून लावली होती, शनिवारी या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले. दरम्यान, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कितीही पाऊस असला, तरी हा मेळावा भव्य आणि मोठ्या स्वरूपात व्हावा, यासाठी पक्ष नियोजन करीत आहे.
दादर येथील शिवाजी पार्कवर होणार्या मेळाव्याच्या तयारीसाठी शनिवारी प्रमुख नेत्यांची चर्चा झाली. मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलेले ठाकरे बंधू निवडणुकीसाठी एकत्र येणार काय, यावर सध्या जोरात चर्चा सुरू आहे. त्याची सुरुवात दसरा मेळाव्यातून होईल, अशी दोन्हीकडील कार्यकर्त्यांना वाटत होते. दोन्ही बंधूंनी यासंदर्भात भेटीगाठी सुरू ठेवल्या असल्या, तरी दसरा मेळाव्याचे निमंत्रण मात्र राज ठाकरे यांना दिले जाणार नाही, असे ठरले आहे.
शिवसेनेचा पहिला मेळावा कधी झाला होता?
शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा 30 ऑक्टोबर 1966 रोजी शिवाजी पार्कवर झाला होता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, त्यांचे बंधू आणि राज ठाकरे यांचे वडील संगीतकार श्रीकांत ठाकरे, पुढे काँग्रेसवासी होऊन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झालेले बॅरिस्टर रामराव आदिक या मेळाव्याला हजर होते. आता महाराष्ट्रवाद अशी घोषणा देत शिवसेना केवळ राजकारण नव्हे, तर समाजकारण करेल, अशी गर्जना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यावेळी केली होती.
पहिल्या दसरा मेळाव्यात प्रबोधनकार ठाकरे काय म्हणाले होते?
कुठल्याही माध्यमाने प्रसिद्धी दिली नसताना ‘मार्मिक’ साप्ताहिकातील हाकेला प्रतिसाद देत हजारो शिवसैनिक या पहिल्या दसरा मेळाव्याला पोहोचले होते. बाळासाहेबांचे वडील प्रबोधनकार ठाकरे यांनी याच मेळाव्यात आजवर बाळ हा ठाकरे कुटुंबाचा होता, आता मी त्याला महाराष्ट्रासाठी मोकळा करतो आहे, असे शब्द वापरत मराठी माणसाने भांडू नये, एक राहावे, असे आवाहन केले होते.
मेळाव्याची लिमका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद
एक वर्ष झालेल्या पावसाचा अपवाद वगळता आजवर प्रत्येक वर्षी दसरा मेळावा झाला अन् तोही शिवाजी पार्कवरच. एकाच ठिकाणी निश्चित दिवशी एकाच नेत्याच्या नेतृत्वात होणार्या या मेळाव्याने केलेल्या विक्रमाची लिमका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली आहे. एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह बाहेर पडून वेगळा पक्ष स्थापन केल्यानंतर त्यांना निवडणूक आयोगाने मान्यता दिल्यानंतर दोन दसरा मेळावे सुरू झाले आहेत. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा मेळावा शिवाजी पार्कवरच होतो आहे.
मनसेचा दुजोरा
भावावर अप्रत्यक्ष आरोप करत शिवसेनेतून बाहेर पडलेले राज ठाकरे मेळाव्याचे स्थान असलेल्या शिवाजी पार्कजवळच राहतात. मराठी भाषा संवर्धनासाठी दोघे भाऊ एकत्र आल्याने ते मेळाव्यासाठीही एकत्र येणार काय, याबद्दल उत्सुकता होती. मात्र, अद्याप निमंत्रण पाठवले गेले नाही, ते पाठवले जाण्याची शक्यताही नाही. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्याशी संपर्क साधला असता राजसाहेबांना निमंत्रण अजून मिळालेले नाही, असे स्पष्ट केले. निमंत्रण मिळावे अशी अपेक्षाही नाही, आमचा पक्ष वेगळा आहे आणि मेळावा त्यांच्या पक्षाचा आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. अर्थात, दोघे भाऊ वेगवेगळ्या पक्षांचे प्रमुख झाले असले, तरी ते निवडणुकांना एकत्र सामोरे जातील, अशी चर्चा मात्र कायम आहे. दोघे भाऊ एकत्र आल्यास मराठी मतदार एकत्र येतील अन् मुंबई महापालिकेच्या निवडणुका याच मुद्द्याभोवती लढल्या जातील, असे मानले जाते.
प्रसंगी चिखलात मेळावा घेऊ : उद्धव ठाकरे
पावसाचा अंदाज असला, तरी वेळप्रसंगी चिखलातही मेळावा घेऊ, असे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. 28 ते 30 सप्टेंबर रोजी आगामी तीन दिवस पावसाचा अंदाज आहे, 2 ऑक्टोबर रोजीचे भाकीत हवामान खात्याने अद्याप केले नसले, तरी पावसाची शक्यता लक्षात घेता काय करायचे, यावर शिवसेना ‘उबाठा’च्या नेत्यांची सविस्तर चर्चा झाली. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या वेळेचा मेळावा भव्य असावा, अशी आखणी केली जाते आहे.