Shiv Sena Dasara Melava
मुंबई : शिंदेंनी दसरा मेळावा अहमदाबाद किंवा सुरतला घ्यावा आणि मेळाव्याला प्रवक्ते म्हणून अमित शहांना बालावावं. मुंबईतील दसरा मेळावा हा बाळासाहेब ठाकरेंनी सुरू केलेली परंपरा आहे, त्यानुसार उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा होत असून बाकी सर्व बोगस आहे. त्यांनी (एकनाथ शिंदे) भगवी शाल घेऊन फोटो लावले आहेत, आता फक्त मीच बाळासाहेब ठाकरे आहे एवढच सांगायचं राहिलं आहे, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली. आज (दि. ३०) ते माध्यमांशी बोलत होते.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची परंपरा असलेल्या दसरा मेळाव्याची शिवसेनेने तयारी सुरू केली आहे. शिवसेना भवनात रविवारी झालेल्या नेत्यांच्या बैठकीत शिवतीर्थावरच मेळावा घेण्याचा निर्णय झाला आणि तशा सूचना आमदार, खासदार, विभागप्रमुख, जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुख तसेच माजी नगरसेवक व शाखाप्रमुख यांना देण्यात आल्या. त्यामुळे पाऊस असला किंवा चिखलाचे साम्राज्य असले तरी शिवतीर्थावरील मेळाव्याच्या तयारीला वेग आला आहे. शिवतीर्थावर सभेच्या ठिकाणी व्यासपीठ उभारण्याचे काम सुरू आहे.
दुसरीकडे शिवसेना शिंदे गटानेही दसरा मेळाव्याची जोरदार तयारी सुरू केली आहे. आझाद मैदानात होणाऱ्या या मेळाव्यासाठी स्टेजची उभारणी अंतिम टप्प्यात आली आहे. शिंदे गटाचा पहिला मेळावा वांद्रे-कुर्ला संकुलात झाला होता. त्यानंतरचे दोन मेळावे आझाद मैदानात घेण्यात आले होते. हा आझाद मैदानातील तिसरा मेळावा ठरेल. या मैदानाची क्षमता सुमारे वीस हजार लोकांची आहे. इतके लोक जमावेत यासाठी शिंदे गटाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पोस्टर्स झळकली आहेत. भगवी शाल अंगावर घेतलेल्या या पोस्टर्सची चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे. आगामी पालिका निवडणुकांच्या दृष्टीने या मेळाव्याकडे पाहिले जात असल्याने एकनाथ शिंदे कडवट हिंदुत्वाची भूमिका मांडू शकतात.