Kolhapur Dasara festival | कोल्हापूरच्या शाही दसरा सोहळ्यास ‘राज्य प्रमुख महोत्सवा’चा दर्जा

22 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरपर्यंत पर्यटनाची लयलूट
Dussehra festival in Kolhapur from tomorrow
Kolhapur Dasara festival | कोल्हापूरच्या शाही दसरा सोहळ्यास ‘राज्य प्रमुख महोत्सवा’चा दर्जाPudhari File Photo
Published on
Updated on

कोल्हापूर : कोल्हापूरच्या शाही दसरा महोत्सवास ‘राज्य प्रमुख महोत्सवा’चा दर्जा देण्यात आला आहे. राज्य शासनाने गुरुवारी तसा आदेश काढला आहे. यासह पर्यटन विभागाच्या महोत्सव दिनदर्शिकेतही या महोत्सवाचा समावेश करण्यात आला आहे. दि. 22 सप्टेंबर ते दि. 2 ऑक्टोबर या कालावधीत आयोजित या महोत्सवात पर्यटनाची लयलूट होणार आहे.

कोल्हापूर शहराला पौराणिक व ऐतिहासिक वारसा लाभला आहे. लोकराजा राजर्षी शाहू छत्रपती यांची जन्मभूमी व कर्मभूमी असलेल्या कोल्हापूरचा शाही दसरा हा राजर्षी शाहूंच्या काळापासून साजरा केला जात आहे. म्हैसूरच्या दसरा उत्सवाप्रमाणेच कोल्हापूरचाही दसरा लोकप्रिय होत आहे. यामुळे या दसरा महोत्सवाला ‘राज्य प्रमुख महोत्सवा’चा दर्जा देण्याची घोषणा 2023 मध्ये झाली होती.

याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सादर करत त्याचा पाठपुरावाही केला होता. या सर्व पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या शाही दसरा महोत्सवाला राज्याच्या प्रमुख महोत्सवाचा दर्जा देण्यात आला आहे. साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पीठ म्हणजे करवीरनिवासिनी श्री अंबाबाईचे प्रसिद्ध मंदिर. शारदीय नवरात्रात राज्यासह देशभरातून सुमारे 30 ते 40 लाख पर्यटक दर्शनासाठी येतात. यासह जागतिक वारसास्थळांच्या यादीत समावेश झालेला पन्हाळगड, दख्खनचा राजा श्रीक्षेत्र जोतिबा मंदिर, गव्यांसाठी प्रसिद्ध दाजीपूर अभयारण्य, कणेरी मठ, आंबा घाट, खिद्रापूर येथील स्थापत्य कलेसाठी जगप्रसिद्ध कोपेश्वर मंदिर आदी पर्यटनाच्या द़ृष्टीने प्रेक्षणीय स्थळे आहेत. पर्यटकांना आवश्यक सुविधा उपलब्ध आहेत.

दसरा महोत्सवास राज्याचा मुख्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्याने पर्यटकांत वाढ होईल, यामुळे स्थानिक रोजगारात वाढ होईल, त्यातून विकास दरवाढीस मदत होईल, असा विश्वास निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी व्यक्त केला. दि. 22 सप्टेंबर ते दि. 2 ऑक्टोबर या कालावधीत या महोत्सवांतर्गत स्थानिक लोककला, लोकनृत्ये, शिवकालीन शस्त्रप्रदर्शन, शिवकालीन युद्धकला यांचे सादरीकरण केले जाणार आहे. यासह सांस्कृतिक कार्यक्रम, पर्यटन संचालनालयामार्फत फॅम टूर्स, पर्यटनविषयक कॉन्क्लेव्ह, फेअर, इव्हेंट आदींचे आयोजनही केले जाणार आहे. यासह ‘नशामुक्त कोल्हापूर, सशक्त (फिट) कोल्हापूर’अंतर्गत प्रबोधनात्मक कार्यक्रमांचेही आयोजन करावे, असेही या आदेशात म्हटले आहे.

या महोत्सवाचे थेट प्रक्षेपण महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या पर्यटन संचालनालयाच्या संकेतस्थळावर व पर्यटन संचालनालयाच्या यूट्यूब चॅनलवर करण्यात येणार आहे. यासह या महोत्सवाची मराठी आणि इंग्रजी भाषेत प्रसिद्धी करावी, असेही या आदेशात म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news