

Raj Thackeray
मुंबई : मुंबई महानगरपालिकेमध्ये महापौर पदासाठी भाजपने मोठी खेळी खेळण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेतल्यानंतर महायुतीचे संख्याबळ १२१ वर पोहोचले आहे, मात्र हे संख्याबळ अधिक वाढवण्यासाठी मनसेच्या ६ नगरसेवकांचा पाठिंबा मिळवण्याबाबत चर्चा सुरू असल्याचे समोर आले होते. यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
भाजपने नुकतीच गणेश कणक यांची गटनेतेपदी नियुक्ती केली असून, महापौर पदाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपची ही खरी कसोटी असणार आहे. जरी युतीकडे बहुमत असले, तरी आपले पारडे अधिक जड करण्यासाठी मनसेला सोबत घेण्याचे प्रयत्न भाजपकडून केले जात आहेत. याआधी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत मनसेने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा दिला होता, त्यामुळे आता मुंबईतही तशीच पुनरावृत्ती होऊन मनसे भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा देणार का, अशी चर्चा सरू होती.
आज (दि.२) माध्यमांशी बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मात्र भाजपला पाठिंबा देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. राज ठाकरे म्हणाले, "भाजपला पाठिंबा देणार असं मी बोललोय का? असा कोणताही विषय झाला नाही. भारतीय जनता पक्षासोबत जाण्यासंदर्भात कुठल्याही पद्धतीची चर्चा झाली नाही," असे म्हणत भाजपला पाठिंबा देण्याचा मुद्दा राज ठाकरे यांनी खोडून काढला.
बई महानगरपालिकेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गटनेता होणार असल्यामुळे महापालिकेच्या निर्णय प्रक्रियेमध्ये त्यांना आपला सहभाग नोंदवता येणार आहे. विशेष म्हणजे महापौरांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या गटनेत्यांच्या बैठकीत मनसेला आपले मत मांडता येणार आहे.
मुंबई महापालिकेच्या 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत मनसेचे सात नगरसेवक निवडून आले होते. परंतु मनसे नगरसेवकांचा गट स्थापन होण्याआधीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने त्यांचे सहा नगरसेवक पळवले. त्यामुळे मनसेला आपला स्वतंत्र गट स्थापन करता आला नाही. परिणामी महापालिकेच्या निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी होता आले नाही. मात्र यावेळी शिवसेना (उबाठा) यांच्या पाठिंब्यामुळे मनसेचे 6 नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे मनसेचा गटनेता होणार आहे.