Raj Thackeray: 'फ्रेंडशिप फाईल’ ऑडिओ क्लिप म्हणत राज ठाकरेंचे टीकास्त्र, मुख्यमंत्र्यांकडे काय मागणी केली?

Raj Thackeray Audio Clip Controversy: मनोज जरांगे पाटील यांनी समोर आणलेल्या ऑडिओ क्लिपमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली असून, त्यातील ५०० कोटी रुपयांच्या दाव्यावरून चर्चा सुरू झाली आहे.
Raj Thackeray Audio Clip Controversy
Raj Thackeray Audio Clip ControversyPudhari
Published on: 
Updated on: 

Raj Thackeray Audio Clip Controversy: मनोज जरांगे पाटील यांनी समोर आणलेल्या ऑडिओ क्लिपमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या क्लिपमध्ये एकनाथ शिंदे यांना भाजपकडून ५०० कोटी रुपये मिळाल्याचा दावा करण्यात आल्याची चर्चा आहे. तसेच धार्मिक मुद्द्यांवरून वातावरण तापवणे, माध्यमांवर दबाव आणणे आणि लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याच्या नियोजनाचाही उल्लेख आहे.

या प्रकरणावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑडिओ क्लिपची सत्यता तपासण्यासाठी फॉरेन्सिक अहवाल मागवला आहे. मात्र, या निर्णयावर टीका करत राज ठाकरे यांनी हा केवळ ऑडिओ क्लिपचा विषय नसून लोकशाहीच्या मूल्यांशी संबंधित गंभीर प्रश्न असल्याचे म्हटले आहे.

‘फ्रेंडशिप फाईल’वरून राज ठाकरेंचा हल्लाबोल

राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्टद्वारे या ऑडिओ क्लिपवर भाष्य केले आहे. त्यांनी या क्लिपचा उल्लेख ‘फ्रेंडशिप फाईल’ असा केला आहे. भाजपचे काही पदाधिकारी, पक्षाच्या सोशल मीडियामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे लोक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक ज्येष्ठ पदाधिकारी आणि स्वतःला राजकीय विश्लेषक म्हणवणारे काही युट्यूबवरील प्रभावशाली व्यक्ती यांच्यातील कथित संभाषण या क्लिपमध्ये असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

या संभाषणात ५०० कोटी रुपयांच्या कथित व्यवहारापासून ते माध्यमांवर दबाव कसा आणायचा, यासारख्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याचा दावा राज ठाकरे यांनी केला आहे. एखादा भावनिक मुद्दा सरकारच्या अडचणी वाढवू लागला, तर लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी धार्मिक ध्रुवीकरणाचा मुद्दा कसा पुढे आणायचा, याबाबतही या क्लिपमध्ये चर्चा असल्याचे त्यांनी नमूद केले.

या क्लिपमधील ५०० कोटी रुपयांच्या मुद्द्यावर सध्या अधिक चर्चा होत आहे. मात्र, भाजपकडून समाजमाध्यमे आणि प्रसारमाध्यमांवर दबाव आणला जात असल्याच्या आरोपांवरही चर्चा होणे गरजेचे आहे, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

‘फॉरेन्सिकच्या नावाखाली वेळ काढू नका’

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ऑडिओ क्लिपचा फॉरेन्सिक अहवाल मागवला असल्याचे सांगितले आहे. मात्र, या निर्णयावर राज ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. ऑडिओ किंवा व्हिडिओची सत्यता तपासण्यासाठी तसेच खून, बलात्कार आणि आर्थिक घोटाळ्यांसारख्या गंभीर प्रकरणांमध्ये पुराव्यांची पडताळणी करण्यासाठी फॉरेन्सिक तपासणी केली जाते, असे त्यांनी म्हटले आहे.

Raj Thackeray Audio Clip Controversy
PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 2,000 रुपये; पीएम किसानच्या 24व्या हप्त्याबाबत मोठी अपडेट, तारीख जाहीर

या प्रकरणातील संभाषण गंभीर असल्याचे मुख्यमंत्र्यांनाही मान्य असल्याचे राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यामुळे केवळ क्लिप खरी आहे की खोटी, एवढ्यापुरतीच तपासणी मर्यादित न ठेवता, त्यामध्ये झालेल्या कथित चर्चेचीही दखल घेतली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

“खरंतर यातलं संभाषण ऐकलं तर समजत की हा लोकशाहीचा खून आणि बलात्कारच आहे,” अशा शब्दांत राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला. या प्रकरणात नेमके काय घडले, याची चौकशी झाली पाहिजे आणि त्यासाठी सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे.

‘ही क्लिप आत्ताच का बाहेर आली?’; राज ठाकरेंचा सवाल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही क्लिप बहुधा दोन वर्षांपूर्वीची असावी, असे म्हटल्याचा उल्लेखही राज ठाकरे यांनी केला आहे. त्यावरून त्यांनी आणखी एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला. ही क्लिप नेमकी बाहेर कशी आली आणि ती समोर आणली कोणी, याचीही चौकशी झाली पाहिजे, असे ते म्हणाले.

या संपूर्ण प्रकरणामागे सत्ताधारी गटातील अंतर्गत राजकारण असण्याची शक्यता व्यक्त करत त्यांनी सरकारच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

Raj Thackeray Audio Clip Controversy
Manoj Jarange Patil: ऑडिओ क्लिपची तारीख आधीच कशी कळली? जरांगे आक्रमक; रामदास कदमांना थेट सवाल करत म्हणाले, 'शिंदेंच्या मुलाचे...'

ठोस भूमिका घेण्याची मागणी

राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या प्रकरणात केवळ तांत्रिक तपासणीचा आधार न घेता ठोस भूमिका घेण्याची मागणी केली आहे. फॉरेन्सिक अहवालातून क्लिपची सत्यता तपासली जावी; पण त्याचबरोबर त्यामध्ये झालेल्या कथित संभाषणाचीही गंभीर दखल घेतली पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्राला या प्रकरणातील सत्य जाणून घ्यायचे आहे. त्यामुळे अहवालाच्या तांत्रिक बाबींमध्ये लोकांना गुंतवून न ठेवता, सरकारने नेमकी काय कारवाई केली आहे, हे स्पष्ट केले पाहिजे, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात निष्पक्षपणे कारवाई केल्याचे जनतेसमोर सिद्ध केले पाहिजे. अन्यथा, सरकारच्या सोयीने वाकवलेला फॉरेन्सिक अहवाल ठरेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news