

Raj Thackeray Manoj Jarange Audio Clip: मनोज जरांगे पाटील यांनी ऑडिओ क्लिप जाहीर केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या क्लिपमध्ये एकनाथ शिंदे यांना भाजपकडून ५०० कोटी रुपये देण्यात आले आणि त्यांनी ते पैसे मनोज जरांगे पाटील यांना दिले, असा दावा करण्यात आला. या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
माध्यमांशी संवाद साधताना राज ठाकरे यांनी या ऑडिओ क्लिपच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या राजकारणावर भाष्य केले. हा विषय केवळ ५०० कोटी रुपयांपुरता मर्यादित नसून, एखाद्या व्यक्तीला बदनाम करण्यासाठी कोणत्या प्रकारचे नियोजन केले जाते, हा खरा प्रश्न असल्याचे त्यांनी म्हटले.
राज ठाकरे म्हणाले की, एखाद्या व्यक्तीला आधी सोबत घ्यायचे आणि नंतर त्याची बदनामी करायची, असे प्रकार सुरू आहेत. त्यानंतर त्या व्यक्तीच्या समर्थकांमध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न केले जातात. मनोज जरांगे पाटील यांच्या बाबतीत नेमके काय सुरू आहे, याचा विचार होणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले.
जरांगे पाटील यांना आरक्षण मिळणार की नाही, हा वेगळा विषय आहे. मात्र, एखाद्या व्यक्तीला सोबत घेऊन नंतर त्याच्याविरोधात वातावरण तयार केले जात असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.
या प्रकरणात प्रसारमाध्यमांच्या भूमिकेवरही राज ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केले. एखादी बातमी कोणी छापावी आणि कोणी छापू नये, याबाबत दबाव निर्माण केला जात असेल, तर हा केवळ माध्यमांपुरता मर्यादित विषय राहत नाही, असे ते म्हणाले.
बातमी प्रसिद्ध केली नाही, तर काय होईल, अशा प्रकारची भीती पत्रकारांमध्ये निर्माण केली जात असेल, तर त्याचीही दखल घेतली पाहिजे, असे राज ठाकरे यांनी नमूद केले. वृत्तपत्र असो किंवा चॅनल असो, हा मुद्दा कोणत्या माध्यमाने बातमी दिली किंवा दिली नाही, एवढ्यापुरता मर्यादित नाही. एखाद्या व्यक्तीविरोधात ठरवून कारस्थान केले जात आहे का, हा गंभीर प्रश्न असल्याचे त्यांनी सांगितले.
या संपूर्ण प्रकरणात राज ठाकरे यांनी सर्वांत महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला तो म्हणजे ही ऑडिओ क्लिप नेमकी आली कुठून? क्लिप कोणी तयार केली, ती कोणी बाहेर आणली आणि तिच्यामागे कोण आहे, याचा शोध घेण्याची गरज आहे. तसेच क्लिपमधली लोक कोण आहेत याची माहिती आम्हाला आहे असे त्यांनी म्हटले. राज ठाकरे म्हणाले, “माझा फक्त प्रश्न एवढाच आहे, ही क्लिप आली कुठून?”
या क्लिपमुळे नेमके कोणाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे, असाही सवाल त्यांनी उपस्थित केला. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यातील राजकीय संबंधांच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणाकडे पाहिले जात असले, तरी त्यामागील सत्य समोर येणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
राज ठाकरे यांनी या प्रकरणात राजकीय नियोजन करणाऱ्यांनाही इशारा दिला. सध्या सत्तेत असताना अनेक गोष्टी केल्या जात असतील, मात्र भविष्यात सत्ता गेल्यानंतर याच गोष्टी अडचणीच्या ठरू शकतात, असा इशारा त्यांनी दिला.
मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात नेमके काय सुरू आहे आणि त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे का, याची माहिती समोर येणे गरजेचे आहे. केवळ आरोप-प्रत्यारोप करून प्रश्न सुटणार नाही. या क्लिपचा उगम आणि तिच्यामागील सत्य समोर आले पाहिजे, असा सूर राज ठाकरे यांच्या प्रतिक्रियेतून दिसून आला.
राज ठाकरे यांनी उपस्थित केलेले प्रश्न आता राजकीय चर्चेचा विषय बनले आहेत. या प्रकरणात संबंधित नेत्यांकडून काय प्रतिक्रिया येतात आणि क्लिपमागील सत्य समोर येते का, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.