

Raj Thackeray on Operation Tiger
मुंबई, पुढारी वृत्तसेवा : "सध्या देशात आणि महाराष्ट्रात सुरू असलेले एकूण राजकीय पक्षांचे पळवापळवीचे राजकारण पाहता, माझ्या पक्षाचा एकही खासदार निवडून आला नाही तेच बरं झालं असं वाटतंय. आजचं राजकारण पाहता निवडणुका न लढवलेलेच बरं," अशी खंत व्यक्त करत "राज्यात सत्ता कोणाची भाजपची, देशात सत्ता भाजपची, मग शिवसेनेचे खासदार हे शिंदेंकडे का जात आहेत?" असा सवाल करत "हे सारं काही फोडाफोडीचे राजकारण २०२९ लोकसभा निवडणुकीसाठी अमित शहा स्वतःसाठी तयारी करत आहेत," असा खळबळजनक दावा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज (दि. २०) केला.
मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात पदाधिकाऱ्यांशी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, "आज कोट्यवधी रुपये खर्च करून आमदार, खासदार आणि नगरसेवक फोडले जात आहेत. या फोडाफोडीच्या राजकारणात आपण आपले मूलभूत अस्तित्वच विसरून जात आहोत. लोकप्रतिनिधींच्या या पळवापळवीमुळे आपण देशाची राजकीय आणि सामाजिक परंपरा विसरून जात आहोत."
यावेळी एका रिपोर्टचा हवाला देत राज ठाकरे म्हणाले की, "एका रिपोर्टनुसार मध्य प्रदेशमध्ये १५ हजार, गुजरातमध्ये ८ हजार आणि सर्वात जास्त २२ हजार १७४ आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या आहेत. शेतकरी आत्महत्या करत आहेत. नीटचे पेपर फुटत आहेत. खासदार, आमदार लहान मुलांसारखे पळवले जातात. आज महाराष्ट्रात अनेक प्रश्न असताना लोकांना भावनिक विषयात अडकवले जात आहे," असा आरोपही त्यांनी केला.
यावेळी राज ठाकरे म्हणाले की, "राज्यात सध्या गंभीर प्रश्न प्रलंबित असताना केवळ फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे. तुम्ही आंदोलन उत्तम करता, लोकांपर्यंत पोहोचता, ही चांगली गोष्ट आहे; पण निवडणूक ही एक प्रक्रिया आहे. आता याचा गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. नाहीतर आपण फक्त आंदोलनच करत राहू. तुम्हाला फक्त आंदोलनांमध्येच व्यस्त ठेवण्याचे कारस्थान सुरू आहे का? याचा विचार करा." असेही राज ठाकरे म्हणाले.
"जैन समाजातील काही लोक राजकारण करत आहेत. एका मुनीचे उदाहरण देत ते म्हणाले की, तो म्हणतो मराठी माणसाशी वाद करू नका, मराठी माणसाचं मनगट पाहिलं आहे का? अनेक मुनी जेव्हा फिरत असतात, तेव्हा तुम्हाला पांढऱ्या पाट्या का लागत नाहीत? नको ती भानगड करू नका. या सगळ्याच्या मागे राजकीय पक्ष उभे राहून हे करत आहेत. आपलं डोकं फिरवायचं आणि आपल्याला त्यातच गुंतवून ठेवायचं, हे त्यांचं गणित आहे, हे लक्षात ठेवा," असेही ते म्हणाले.
"तुम्ही काय फक्त मतदान करायचे? आज भाजप करतंय, उद्या दुसरा पक्ष करेल. याला निवडणुका म्हणतात का? आपण 'महाराष्ट्र धर्म' विसरलो आहोत का? आज सगळ्या गोष्टी विकल्या जात आहेत. नेते विकले जात आहेत आणि जर हेच पुन्हा निवडून आले, तर भविष्यात मोठे संकट समोर आहे. काळ सुखावत चालला आहे, लोकांनी आता विचार करण्याची वेळ आली आहे," असे आवाहनही राज ठाकरे यांनी केले.
"भारताच्या पॉवर मिनिस्ट्रीने (ऊर्जा मंत्रालय) एक रिपोर्ट आणला आहे, ज्यामध्ये महाराष्ट्राला १०० पैकी केवळ दीड गुण मिळाला आहे. महाराष्ट्राची वीज आता अदानी ठरवणार का? तुम्हाला आंदोलनात व्यस्त ठेवून मागून हे उद्योग सुरू आहेत. 'लाडकी बहीण' सारख्या योजनांनी देश चालू शकत नाही. इतर ठिकाणांहून पैसे काढून हे काय सुरू आहे? भविष्यात आपण आपल्या पिढीचे किती नुकसान करत आहोत, याचे भान ठेवले पाहिजे." ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल यांच्यावर कारवाई करून संपूर्ण सिस्टम ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावाही राज ठाकरे यांनी केला.
"खरा मतदार कोण आहे, हे तुम्ही पाहिले पाहिजे. वरवरचे आंदोलन करून फायदा नाही. आपल्याला मते का मिळत नाहीत, याचे आत्मपरीक्षण करावे लागेल. आता जनगणना सुरू होत आहे. हे काम करताना अधिकाऱ्यांसोबत भाजपचे लोक का जात आहेत? गप्पा मारता मारता त्यांना अंदाज येतो की हा मतदार आपला नाही, आणि मग तिथून मतं कापली जातात. त्यामुळे तिथे डोळ्यात तेल घालून लक्ष द्या. दुबार मतदारांची गोष्ट अजिबात साधी नाही, ती अत्यंत गंभीर आहे. तुमचं सर्व गोष्टींवर लक्ष पाहिजे. जर तुम्हाला याचे भान नसेल, तर निवडणुका लढवून फायदा नाही. म्हणूनच मी मागे एकदा निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याबाबत बोललो होतो," असेही राज ठाकरे म्हणाले.
"सत्ता कधीच कायमस्वरूपी राहत नाही, ही सत्ताही एक दिवस जाईल. राज्यात सत्ता भाजपची, देशात सत्ता भाजपची; मग शिवसेनेचे खासदार हे शिंदेंकडे का जात आहेत? अमित शाह स्वतःची तयारी करत आहेत का? भाजपमध्ये सध्या आतून सगळे पेटले आहेत, फक्त मोदी आहेत म्हणून सगळे शांत आहेत. देशात आणि राज्यात काहीतरी बदल होईल, असे अनेक लोकांना वाटत आहे," असा दावाही राज ठाकरे यांनी केला.