Uddhav Thackeray | पक्षप्रमुखपद सोडण्यास तयार; उद्धव यांच्या प्रस्तावाने खळबळ

Uddhav Thackeray |
Uddhav Thackeray | पक्षप्रमुखपद सोडण्यास तयार; उद्धव यांच्या प्रस्तावाने खळबळ
Published on
Updated on

मुंबई : ठाकरे कुटुंबांवर खोटे-नाटे आरोप केले जात आहेत. हे आरोप तुम्हाला खरे वाटत असतील तर मी शिवसेना पक्षप्रमुखपदावरून पायउतार व्हायला तयार आहे, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी झालेल्या मेळाव्‍यात जाहीर केले आणि षण्मुखानंद सभागृहात एकच हलकल्लोळ उडाला. तो हातानेच रोखत उद्धव म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुखपद मी शिवसैनिकाच्या हातात द्यायलाही तयार आहे. अट एकच, सोन्यासारखी ही शिवसेना दरोडेखोर, गद्दारांच्या हातात जाऊ द्यायची नाही!

शुक्रवारी शिवसेनेच्या ६० व्या वर्धापन दिनाला आणखी एका पक्षफुटीची पार्श्वभूमी होती. उद्धव ठाकरेंचे सहा खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोडले. उद्धव शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन करण्यास निघाले आहेत, म्हणून आम्ही फुटलो, असे बंडखोर खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना दिलेल्या पत्रात म्हटल्याचे सांगितले जाते. या सर्व पार्श्वभूमीवर सायनच्या षण्मुखानंद सभागृहात आयोजित शिवसेनेच्या मेळाव्‍यात उद्धव काय उत्तर देतात याकडे सर्वांचेच लक्ष होते. पक्ष फूट, फोडाफोडी, गद्दारी आणि भाजपचे राजकारण यावर उद्धव यांनी हल्लाबोल चढवला. जमलेल्या माझ्या हिऱ्यापेक्षा अनमोल आणि जीवाला जीव देणाऱ्या बांधवांनो आणि भगिनींनो... अशी साद घालत उद्धव यांनी भाषणाला सुरुवात केली.

आपला पक्ष सोडणाऱ्यांचे काय करायला पाहिजे हे आदेश देण्याची मी गरज नाही. बाळासाहेबांनी शिवसैनिकांना काय करायचे ते सांगून ठेवले आहे, असा सूचक इशारा देत उद्धव म्हणाले, ३० वर्षे भाजपसोबत राहून आम्ही शिवसेनेचे भाजपमध्ये विलीनीकरण केले नाही; तर काँग्रेसमध्ये काय विलीन होणार? किती संकटे आली तरी बेहत्तर. मी मराठी माणसांच्या हक्कांसाठी उभी केलेली संघटना कुणाच्या दावणीला बांधणार नाही. उलट भाजपच शिंदे गटात विलीन होईल की काय, अशी भीती मूळ भाजप कार्यकर्त्यांना आता वाटू लागली आहे. उपरे डोक्यावर बसले आहेत. किती दिवस याची दाढी कुरवाळत बसायचे, असे भाजपवाले सांगत आहेत. त्यांना पोरे होत नाहीत म्हणून दुसऱ्याची पोर पळवत आहेत. वांझोटी विचारसरणी असलेल्यांचे हे उद्योग आहेत, असा टोला त्यांनी लगावला.

भेटत नाही, मग सभा कुणी घेतल्या?

शिवसेनेला ६० वर्षे झाली तेव्हा नेत्यांची फळी होती. सगळ्यांनी कष्ट उपसले. त्यामुळे ही संघटना उभी राहिली. तेव्हा फुटीचे संकट नव्हते. निवडणुकीच्या निकालाची तुलना होऊ लागली तेथे आपण फसलो. आपला दरारा होता. सत्तेसाठी शिवसेना जन्माला आलेली नाही. सत्ता शिवसेनेसाठी जन्म घेते, असे सांगून उद्धव म्हणाले, मी भेटत नाही, असा आरोप करत आहेत. मी भेटलो नसतो तर निवडून कसे आलात? लोकसभेच्या निवडणुकीत दहा-दहा सभा घेतल्या. पण आता जिल्हास्तरावर त्यांनी जबाबदारी घ्यायला नको का, असा प्रश्न उद्धव यांनी केला. आता झाडाच्या मुळांपेक्षा पारंब्यांना नमस्कार केला जात आहे. आमच्यावर शिंतोडे उडवले जात आहेत. या अवलादी आल्या कुठून? शिवसेना नसती तर हे कुठे असते? शिवसेना स्थापन झाली तेव्हा मी लहान होतो. पण अनेक पिढ्यांनी सोसले म्हणून आज सगळे आहेत. सगळ्या महापुरुषांना त्यांच्या काळात टीका सहन करावी लागली. तसे ठाकरे कुटुंबाने कष्ट केले आहेत. आमच्यावर हल्ले झाले तेव्हा हे गद्दार कुठे होते?

गद्दारीचा शिक्का कायम

जे खासदार फुटले तेथील मतदारांची मी माफी मागतो. पण मत तुम्ही दिले. आता मतदारांनीच त्यांना जाब विचारला पाहिजे, आदेशाची गरज नाही, असे सांगून उद्धव म्हणाले, खंडोजी खोपडे, सूर्याजी पिसाळ यांना ४०० वर्षे झाली तरी गद्दारीचा शिक्का पुसता आला नाही. आता जे गेले त्यांना गद्दारांचा शिक्का पुसता येणार नाही. शिवसेना ही कायम राहणार आहे. आमच्या पक्षाच्या मुळावर आले आहेत ते तुम्ही उद्ध्वस्त व्हाल, असे उद्धव ठाकरेंनी ठणकावून सांगितले.

वन पार्टी - नो इलेक्शन

आजघडीला भाजपचे दोन तृतीयांश खासदार बाहेरूनच आलेले आहेत. तुमच्याकडे विचारांचे वांझोटेपण आहे. म्हणून आमची पाेरं किती दिवस पळवणार? २०२४ साली मोदी लाट असताना मतदारांनी माझ्यावर आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर विश्वास ठेवून ९ खासदार आमचे निवडून दिले. त्यातलेही सहा खासदार आता फोडले. ही फोडाफोडी करून काय मिळणार आहे? आणखी किती सत्तापिपासू होणार आहात, असे सवाल भाजप आणि शिंदे सेनेला करत उद्धव म्हणाले, आज ज्या पद्धतीने देशाचे राजकारण चालू आहे, त्यामुळे लोकशाहीवरचा विश्वास उडत चालला आहे. देश अराजकाच्या दिशेने चालला आहे. भाजपची वाटचाल वन पार्टी - नो इलेक्शनच्या दिशेने सुरू आहे. मात्र, भाजपची सत्ता दीर्घ काळ राहणार नाही. ज्या तरुणांना झुरळ म्हटले जात आहे, पण हीच तरुण पिढी यांची सत्ता उलथवून टाकेल, असा इशाराही उद्धव यांनी दिला.

जनतेने ऑपरेशन कमळ करावे

शिवसेना निवडणूक लढणार नाही. मग माझ्यासोबत कोण राहील, असा सवाल त्यांनी शिवसैनिकांना केला. आपल्याला विरोध करणारे गोमूत्रधारी आहेत. त्यांचे शेठजी-भटजीचे हिंदुत्व आहे. आमचे हिंदुत्व राष्ट्रीयत्व आहे. लोकशाही धोक्यात आली आहे. अराजकता माजली आहे. त्यामुळे या देशातील जनतेला आता ऑपरेशन कमळ करावे लागेल, असे आवाहन उद्धव यांनी केले.

तुम्ही माझ्यासोबत असाल तर पहाडासारखा उभा राहीन

माझ्यावर कुणी आरोप करत असेल तर त्याला उत्तर तुम्ही द्यायचे आहे. मला नेतृत्वाची हाव नाही. मी पद सोडायला तयार आहे. मी पद सोडावे असे तुम्हाला वाटेल तेव्‍हा मी पद सोडल्याशिवाय राहणार नाही, असा निर्वाणीचा समारोप उद्धव ठाकरे यांनी करताच शिवसैनिकांनी तुम्हीच पक्षप्रमुख हवेत, अशा घोषणा देत षण्मुखानंद सभागृह दणाणून सोडले. त्यावर उद्धव म्हणाले, मी पळणारा नाही. तुम्ही माझ्या सोबत असाल तर पहाडासारखा उभा राहीन आणि ही शिवसेना चोर - दरोडेखोरांच्या हाती देणार नाही.

logo
Pudhari News
pudhari.news