

Sanjay Raut Video: महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील संभाव्य फुटीच्या चर्चांनी जोर धरला असतानाच खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत बंडखोर खासदारांवर जोरदार हल्लाबोल केला. पक्षाशी एकनिष्ठ राहणाऱ्या नेत्यांचे कौतुक करताना त्यांनी संभाव्य पक्षांतर करणाऱ्यांवर अत्यंत तीव्र शब्दांत टीका केली.
शिवसेना (यूबीटी)मधील काही खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चांमुळे राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर माध्यमांशी संवाद साधताना राऊत यांनी नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांचे विशेष कौतुक केले. सुरुवातीपासूनच उद्धव ठाकरे यांच्यासोबत ठामपणे उभे राहिल्याबद्दल त्यांनी वाजे यांच्या निष्ठेचा उल्लेख केला.
"पक्षाने आपल्याला दिलेली ओळख आणि स्थान कधीही विसरता कामा नये. राजाभाऊ वाजे यांनी त्यांची भूमिका स्पष्टपणे मांडली आहे. हीच खरी निष्ठा आहे," असे राऊत म्हणाले.
संजय राऊत म्हणाले की, “उद्धव ठाकरेंनी आम्हाला भावासारखं वागवलं. बाळासाहेबांनी आम्हाला वडिलांसारखं प्रेम केलं. हे साXX भोXXXX लोकं कोण जातात हे, डोन्ट कट. कट मत करना हे बेईमान लोक आहे. हे बेईमान आहेत. त्यांच्या रक्तात बेईमानी आहे. मी कोणत्या पार्टीचं आणि व्यक्तीचं नाव घेत नाही. सध्याच्या लोकशाही व्यवस्थते, आयोग, सुप्रीम कोर्ट आणि लोकसभा अध्यक्षांची काय हैसियत आहे माहीत आहे.”
यानंतर त्यांनी संभाव्य बंडखोर खासदारांवर निशाणा साधला. पक्षाच्या विश्वासावर आणि नेतृत्वाच्या पाठिंब्यावर निवडून आलेले लोक जर पक्ष सोडण्याचा विचार करत असतील, तर तो मतदारांशी आणि पक्षाशी विश्वासघात असल्याचे त्यांनी म्हटले. उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांनी कार्यकर्ते व नेत्यांना कुटुंबातील सदस्यांप्रमाणे वागणूक दिली, असे सांगत त्यांनी नाराजी व्यक्त केली.
राऊत यांनी आरोप केला की काही लोक वैयक्तिक फायद्यासाठी पक्षाशी बेईमानी करत आहेत. "शिवसेना ही आमच्यासाठी केवळ राजकीय संघटना नाही, तर ती आमची विचारधारा आणि ओळख आहे. जो कोणी पक्षाशी दगाबाजी करेल, त्याला जनतेसमोर उत्तर द्यावे लागेल," असा इशाराही त्यांनी दिला.
यावेळी त्यांनी काही खासदारांना पक्षांतरासाठी आर्थिक आमिष दाखवले जात असल्याचाही गंभीर आरोप केला. काही लोक मोठ्या रकमेच्या मोबदल्यात भूमिका बदलत असल्याची चर्चा असल्याचे त्यांनी म्हटले. मात्र या आरोपांबाबत कोणतेही ठोस पुरावे त्यांनी सादर केले नाहीत.
दरम्यान, पक्षाच्या संसदीय समितीची बैठक लवकरच होणार असून सर्व खासदारांना उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहितीही राऊत यांनी दिली. बैठकीनंतर पक्ष पुढील भूमिका निश्चित करेल, असे ते म्हणाले.
शिवसेना (यूबीटी)मधील संभाव्य फुटीच्या चर्चांमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. आगामी काही दिवसांत बंडखोर खासदार नेमकी कोणती भूमिका घेतात आणि ठाकरे गट त्याला कशा पद्धतीने सामोरे जातो, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.