

Shashikant Shinde on municipal elections
नागपूर : राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकीमध्ये शरद पवार राष्ट्रवादी आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र येतील, असे संकेत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी आज 'पुढारी न्यूज'शी बोलताना दिले.
यावेळी शशिकांत शिंदे म्हणाले की, "राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष शरद पवारांनी उभा केला. सर्वांनीच मेहनत घेतली होती. हाच पक्ष भाजपने फोडण्याचा प्रयत्न केला. लोकशाहीमध्ये विरोधक असावा लागतो. विरोधक राज्यातून आणि देशातून संपवायचा प्रयत्न लोकशाही धोक्यात आहे. मध्यमंतर नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणूक जाहीर झाली तेव्हा शरद पवारांबरोबर बैठक झाली. यावेळी त्यांनी आपल्याला महाविकास आघाडी म्हणून लढायचे आहे, असे स्पष्ट सांगितले होते. भाजप सोडून अन्य कोणत्याही पक्षाशी आघाडी करा, असेही त्यांनी सांगितले होते. स्थानिक पातळीवर शिंदे गटाशी, महाविकास आघाडी, ठाकरे गट किंवा काँग्रेस असो आम्ही आघाडी केली होती."
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात असे आम्हाला मनापासून वाटते; पण जोपर्यंत दिल्लीवाल्यांच्या मनात येत नाही तोपर्यंत हे कसे शक्य आहे, असे सूचक विधान करत त्यांनी महानगरपालिका निवडणुकीत स्थानिक पातळीवरील समीकरणानुसार आम्ही एकत्र लढू, असे संकेतही शशिकांत शिंदे यांनी दिले. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार का यावर चर्चा सुरू आहे. निवडणुकीपूर्वी अशा चर्चा होतात. शरद पवार कोणावरही निर्णय लादत नाहीत. सर्वांना मत व्यक्त करण्याचा अधिकार देतात. आताच्या घडीला तरी दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यावे असा कोणताही प्रस्ताव आलेला नाही. मात्र तसा प्रस्ताव असल्यास चर्चा करू, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येतील का, याबाबत शशिकांत शिंदे यांनी सांगितले की, "स्थानिक पातळीवरील आघाडीबाबत शरद पवारांनी यापूर्वीच भूमिका स्पष्ट केली आहे. मी स्वत: १९ डिसेंबरला पुण्यात बैठक घेणार आहे. यामध्ये कोणता निर्णय होतो यावर शरद पवारांशी चर्चा केली जाईल. यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल."
सध्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात वेळ कमी आहे. राज्यात अवकाळी पावसाने झालेले नुकसान, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, भ्रष्टाचार, कायदा-सुव्यवस्था यावर आम्हाला आवाज उठवायचा आहे. अधिवेशनात सत्ताधाऱ्यांबरोबर विरोधी पक्षाच्या सदस्यांनाही तेवढाच सन्मान मिळत होता. अधिकार्यांबरोबर सत्तारूढ पक्षांवरही दबाव असायचा; मात्र मागील काही काळात यामध्ये बदल झाला आहे. आता कोणाला भीती राहिलेली नाही. कारण सत्तेमध्ये लोक आपल्याबरोबर आहेत असा विश्वास अधिकार्यांमध्ये वाढला आहे. राज्यकर्ते आणि अधिकारी संगनमत आहे. विरोधी पक्षनेता नाही ही वस्तुस्थिती आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी अधिवेशन होणे अपेक्षित आहे. सध्या तसे दिसत नाही. केवळ काम उरकणे एवढेच सरकारचे काम राहिले आहे, असेही ते म्हणाले. अधिवेशनात सखोल चर्चा होणे गरजेचे आहे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. राष्ट्रवादीच्या आमच्या गटाच्या सदस्यांची आज बैठक झाली. राज्यातील कोणत्या प्रश्नांवर पक्षाच्या सदस्यांनी आक्रमक राहावे, याबाबत सविस्तर चर्चा झाल्याचेही त्यांनी सांगितले.