

ठळक मुद्दे
३० डिसेंबर उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस
मुंबईत युतीच्या २० जागांचा निर्णय फडणवीस-शिंदे घेणार
अजित पवार गटाकडून ३७ उमेदवारांच्या नावाची घोषणा
मुंबई : मुंबईसह राज्यभरातील महानगरपालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास आता अवघ्या दोन दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. एकीकडे इच्छुकांची गर्दी आणि दुसरीकडे विरोधी पक्षांकडून उमेदवार पळविण्याची भीती, यामुळे सर्वच राजकीय पक्षांना बंडांची भीती वाटू लागली आहे. बहुतांश ठिकाणी पक्षांनी आपल्या उमेदवारांबाबत कमालीची गुप्तता बाळगली असली तरी पक्षांना सोमवारी आपली यादी जाहीर करावीच लागणार आहे. त्यामुळे बंडोबांना थंडोबा करायचे कसे, याचा दबाव पक्षांवर वाढला आहे.
या पार्श्वभूमीवर उमेदवारांची यादी वगैरे जाहीर करून बंडाळीला निमंत्रणे देण्यापेक्षा थेट फोन करून 'निरोप' देण्याचा पर्याय राजकीय पक्षांनी निवडला आहे. नाव नक्की झालेल्या उमेदवारांना फोन करून अर्ज भरण्यासाठी तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. पण त्यातून आजचे संकट उद्यावर जाईल, यापेक्षा फारसे काही होणार नाही. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता केवळ सोमवार आणि मंगळवार असे दोनच दिवस शिल्लक राहिल्याने वेळेत अर्ज सादर करण्याचे आव्हान इच्छुकांसमोर असणार आहे. युतीच्या चर्चा लांबल्याने इच्छुकांची मात्र चांगलीच कोंडी झाली आहे. उमेदवारी दिल्याचे किंवा नाकारल्याचे अधिकृतपणे नक्की होत नाही, तोपर्यंत इच्छुकांच्या हाती वाट पाहण्याखेरीज दुसरा पर्याय उरलेला नाही.
राज्यात मुंबईसह २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी २३ ते ३० डिसेंबर असा आठ दिवसांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. आता अवघे दोन दिवस शिल्लक असले तरी प्रमुख राजकीय पक्षांकडून उमेदवारांच्या नावांची घोषणाच करण्यात आलेली नाही.
युती आणि आघाडीच्या चर्चेचे गुऱ्हाळ शेवटपर्यंत चालू ठेवण्यामागेही बंडोबांना थंड करण्याचा हेतू असल्याचे बोलले जात आहे. सत्ताधारी महायुतीतील भाजप आणि शिवसेनेत मुंबईसह महत्त्वाच्या महापालिकांतील युतीसाठी चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. मुंबईतील २२७ जागांपैकी २०७ जागांवर दोन्ही पक्षांचे एकमत झाले असून केवळ २० जागांवर निर्णय बाकी आहे. २०७ पैकी १२८ जागा भाजपकडे तर ७९ जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला आल्या आहेत. उर्वरित २० जागांसाठी रविवारी रात्री चर्चेला सुरूवात होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून तिढा असलेल्या जागांवर अंतिम निर्णय करतील. महायुतीमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सहमती झालेल्या जागांवरील संभाव्य उमेदवारांना निरोप पाठविले जात आहेत. पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला बंडाळीचा फटका बसू नये, यासाठी ही काळजी घेतली जात आहे. दुसरीकडे अनेक इच्छुकांनी अपक्ष म्हणून अर्ज भरण्याची तयारीही चालविल्याचे समजते.
ठाकरे गटाच्या ५० उमेदवारांना एबी फॉर्म ?
ठाकरे गटाच्या सुमारे ५० उमेदवारांना रात्री उशिरा एबी फॉर्म देण्यात आल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. हे फॉर्म देताना कमालीची काळजी घेण्यात आली होती. ही नावे भाजपला समजू नयेत यासाठी विश्वासू कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हे फॉर्म उमेदवारांपर्यंत पोहोचवण्यात आल्याचे समजते.मुंबईत काँग्रेस- 'वंचित' आघाडी
वंचित ६२ जागा लढवणार; इतर ठिकाणी निर्णय स्थानिक पातळीवर
मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस व वंचित बहुजन आघाडी यांच्या आघाडीची रविवारी घोषणा करण्यात आली. मुंबईत वंचित बहुजन आघाडी ६२ जागा लढणार असून राज्यातील इतर २८ महानगरपालिकेतील आघाडीसंदर्भात स्थानिक पातळीवर सकारात्मक निर्णय घेतला जाईल, अशी घोषणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी केली.
काँग्रेस व वंचित बहुजन आघाडी यांची युती ही नैसर्गिक युती आहे. दोन्ही पक्षांची वैचारिक भूमिका एकच आहे. दोन्ही पक्ष संविधानवादी आहेत. १९९८ व १९९९ च्या निवडणुकीत दोन्ही पक्षात आघाडी झाली होती, आता पुन्हा २५ वर्षांनी दोन पक्ष एकत्र आले आहेत. या प्रक्रियेसाठी थोडा वेळ लागला. पण आजपासून नव्या पर्वाला सुरुवात झालेली आहे. हा आकड्यांचा खेळ नसून विचारांचा मेळ आहे, असे सपकाळ म्हणाले. भाजपला रोखण्यासाठी दोन्ही पक्ष एकत्र आलेले आहेत. आघाडीसाठी काँग्रेसने पहिले पाऊल टाकले. सुरुवातीपासूनच सकारात्मक भूमिका घेतली होती. मुंबई महानगरपालिकेत वंचित बहुजन आघाडी ६२ जागांवर लढणार आहे, असे वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. पुंडकर यांनी सांगितले. आघाडीमध्ये जागावाटपाची चर्चा कधीच समाधानकारक होत नसते. पण कुठेतरी थांबावे लागते. आघाडीसाठी दोन्ही बाजूकडून सकारात्मक चर्चा झाली. मुंबई महापालिकेसाठी आज आघाडी जाहीर करण्यात आली असून इतर महानगरपालिकेत दोन्ही पक्षांचे स्थानिक नेतृत्व सकारात्मक निर्णय घेईल, असे पाऊल टाकले. सुरुवातीपासूनच सकारात्मक भूमिका घेतली होती. मुंबई महानगरपालिकेत वंचित बहुजन आघाडी ६२ जागांवर लढणार आहे. असे वंचितचे पंडकर म्हणाले.
काँग्रेसची आज पहिली यादी
काँग्रेसने मुंबईत वंचित बहुजन आघाडीसोबत मुंबई पालिकेसाठी युती करून नवा प्रयोग केला आहे. जागावाटपाची चर्चा पूर्ण करून त्यांनी मुंबईत आघाडी घेतली आहे. त्यामुळे सोमवारी काँग्रेस उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार आहे. त्याचबरोबर उमेदवारांना ए व बी फॉर्मही द्यायला सुरुवात करणार असल्याची माहिती पक्षाच्या एका नेत्याने दिली.
हे वॉर्ड वंचितच्या वाट्याला :-
६, ११, १२, १३, १४, १५, १९, २१, २४, २५, २७, ३०, ३८, ४२, ४६, ५३, ५४,५६,६७,६८, ७३, ७६, ८०,८४, ८५, ८८, ९५, ९८, १०७, १०८, १११, ११३, ११४, ११७, ११८, ११९, १२१, १२२, १२३, १२४, १२७, १३९, १४६, १५३, १५५, १५७, १६०, १६४, १६९, १७३, १७७, १८२, १८३, १९४, १९५, १९६, १९७, १९८, १९९, २०२, २०७,२२५
आज रात्री दोन्ही पक्षांकडून उमेदवारांना दिले जाणार एबी फार्म
नवी मुंबई : राजेंद्र पाटील
नवी मुंबईत जागावाटपावर समाधानकारक तोडगा न निघाल्याने अखेर शिवसेना-भाजपने स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी त्याची अधिकृत घोषणा केली जाऊ शकते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्यात मंत्रालयात झालेल्या चर्चेनंतर दोन्ही पक्षांमध्ये नवी मुंबईत बैठकीची फेरी झाली. मात्र, कुणी किती जागांवर लढावे यावर एकमत झाले नाही. त्यामुळे बैठक निष्फळ ठरली. सोमवारी रात्री उमेदवारांना पक्षांकडून एबी फार्म दिले जाणार आहेत. मंगळवारी शेवटच्या दिवशी शिंदेंची शिवसेना आणि भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत.
गेल्या आठवड्यात झालेल्या युतीच्या बैठकीमध्ये भाजपच्या वतीने माजी महापौर सागर नाईक यांनी एकूण १११ जागांपैकी ८० जागांची ठाम मागणी मांडली होती. याशिवाय भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी बेलापूर मतदारसंघासाठी स्वतंत्रपणे ४० जागांची मागणी केली.
दुसरीकडे, शिवसेना शिंदे गटाने नवी मुंबईत आपली वाढलेली संघटनात्मक ताकद आणि मागील निवडणुकांतील कामगिरीचा दाखला देत ५७ जागांवर दावा सांगितला होता. या आकड्यांमुळे बैठक चर्चेऐवजी वादाच्या दिशेने वळली आणि युती फिस्कटली आणि शनिवारी रात्रीच दोन्ही पक्षांकडून आपल्या नेत्यांना स्वबळावर निवडणूक लढणार असल्याचा निरोप देण्यात आला. रविवारी भाजपची आठ वाजता ऑनलाईन बैठक झाली आणि त्यामध्ये उद्या सोमवारी रात्री भाजपची पक्षांकडून अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. शिवसेना उबाठा आणि मनसे यांची या महापालिकेत युतीने लढण्यावर सहमती झाली असून, त्यांच्यातील जागावाटप सोमवारी (दि.26) जाहीर होईल.
शिंदेसेनेत यांना पाहिजेत एकाच घरात दोन ते तीन तिकिट
ऐरोली, तुर्भे, वाशी, नेरुळ, कोपरखैरणे, घणसोली, महापे, सानपाडा येथे शिवसेनेची ताकद आणखी वाढली आहे. कोपरखैरणेत शिवराम पाटील, सानपाडामध्ये सोमनाथ वास्कर, वाशीत अविनाश लाड, नेरुळमध्ये विजय माने, ऐरोलीत एम. के. मढवी कुटुंब, डी. आर. पाटील यांचे बंधू चंद्रकांत पाटील, तुर्भेतील सुरेश कुलकर्णी, बेलापूर येथील पूनम पाटील, मिथुन पाटील, कोपरखैरणेचे अंकुश कदम, दिघा येथील यादव कुटुंब अशा माजी नगरसेवकांना पक्षप्रवेश देत शिंदेंच्या शिवसेनेने आपली ताकद वाढवली.
आता या घराण्यांनी आपल्या कुटुंबातीलदोन ते तीन जणांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली आहे. काहींनी ब्लॅकमेलिंग करणे सुरु केले आहे. तर ज्यांची तिकीट कापली जातील ते बंडखोर उमेदवार म्हणून निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. किंवा शरद पवार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवू शकतात. त्यासाठी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे हे वेट अॅण्ड वॉचच्या भुमिकेत आहेत. ऐनवेळेस येणाऱ्या उमेदवारांना त्याच्याकडून उमेदवार देत निवडणुकीत रंगत आणली जाऊ शकते. असे सूत्रांकडून सांगण्यात आले.
एकाही उमेदवाराचा अर्ज दाखल नाही; जागांचे गणित रखडलेलेच
पनवेल : पनवेल महानगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास अवघे दोन दिवस शिल्लक असतानाही महायुती आणि महाविकास आघाडीने आपले उमेदवार जाहीर न केल्याने संभ्रम कायम आहे.
गेल्या चार दिवसांत ८५० हून अधिक उमेदवारी अर्ज व नामनिर्देशन पत्रांची विक्री झाली असली, तरी एकाही इच्छुक उमेदवाराने अर्ज दाखल न केल्याने राजकीय गणिते शेवटच्या टप्प्यात अडकल्याचे स्पष्ट होत आहे. २०१७ च्या पनवेल महानगरपालिका निवडणुकीत भाजपने एकहाती सत्ता मिळवत ५१ नगरसेवक निवडून आणले होते. त्या वेळी विरोधी बाकावर असलेल्या शेकाप आणि महाविकास आघाडीतील पक्षांचे मिळून २० हून अधिक नगरसेवक निवडून आले होते. त्यामुळे यंदाही भाजप मुसंडी मारेल, अशी चर्चा सुरुवातीपासून सुरू आहे. मात्र, निवडणूक जाहीर होऊन दिवस उलटत असतानाही भाजपकडून एकही अधिकृत उमेदवारी यादी जाहीर न झाल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
दुसरीकडे महाविकास आघाडीबाबतही गोंधळ कायम आहे. आघाडी 'जुळली आहे' असे सांगितले जात असले, तरी अधिकृत घो-षणा आणि उमेदवारांची यादी अद्याप समोर आलेली नाही. शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे पक्ष एका मंचावर येऊन महायुतीला आव्हान देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. मात्र जागावाटप आणि स्थानिक समीकरणांमुळे अंतिम निर्णय रखडल्याचे चित्र आहे.
महायुतीच्या आघाडीवरही चित्र स्पष्ट नाही. भाजप आणि शिंदे गटाची शिवसेना यांच्यात युती होईल, या आशेवर दोन्ही पक्षांतील इच्छुक उमेदवार सध्या वाट पाहत आहेत. महायुतीची अधिकृत घोषणा न झाल्याने अनेक प्रभागांत इच्छुकांची धाकधूक वाढली आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता केवळ दोन दिवसांचा कालावधी शिल्लक राहिल्याने शेवटच्या क्षणी राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे.