

पवन होन्याळकर
मुंबई: अकरावी-बारावीची दोन वर्षे आणि त्यानंतर द्यावी लागणारी 'एमएचटी-सीईटी'परीक्षेचा ताण टाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी आता एक नवीन आणि सोपा 'शॉर्टकट' शोधला आहे.
अभियांत्रिकी आणि फार्मसी पदवीच्या थेट दुसऱ्या वर्षात (डायरेक्ट सेंकड एअर) प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा कल गेल्या तीन वर्षांत झपाट्याने वाढला असल्याचे समोर आले आहे.
दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर अनेक विद्यार्थी अकरावी-बारावीऐवजी थेट तीन वर्षांचा पॉलिटेक्निक डिप्लोमा (पदविका) पूर्ण करत आहेत. यंदा प्रवेशाचा आकडा दिड लाखावर पोहचला आहे. हा डिप्लोमा पूर्ण होताच विद्यार्थ्यांना केंद्रीय प्रवेश प्रक्रियेद्वारे (कॅप) थेट अभियांत्रिकीच्या पदवी अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षात प्रवेश मिळतो.
यामुळे विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक वर्ष वाया जात नाही आणि सीईटीच्या कठीण परीक्षेला सामोरे जावे लागत नाही. याबरोबरच बी.फार्मसीच्या दुसऱ्या वर्षी प्रवेशासाठी बारावी (सायन्स) आणि त्यानंतर फार्मसी डिप्लोमा करणे अपरिहार्य असले, तरीही विद्यार्थी या मार्गाला प्राधान्य देत आहेत.
औषधनिर्माण क्षेत्रात मिळणाऱ्या स्थिर करिअरच्या आणि नोकरीच्या खात्रीशीर संधींमुळे विद्यार्थी या पर्यायाकडे आकर्षित होत आहेत. २०२३-२४ मध्ये अभियांत्रिकीच्या थेट द्वितीय वर्षात प्रवेश घेणारे ३४ हजार ७१६ इतके होते. यंदा (२०२६-२७) मध्ये थेट ५० हजार १५८ वर पोहोचली आहे.
विशेष म्हणजे यामध्ये मुलींचा सहभाग वाढला असून, प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थिनींची संख्या १० हजारांवरून सुमारे २० हजारांपेक्षा अधिक झाली आहे. याबरोबरच फार्मसी (डीएसपी) पदवीच्या थेट दुसऱ्या वर्षाच्या प्रवेशांकडे २०२३-२४ मध्ये ८ हजार ७१३ असलेले एकूण प्रवेश २०२६-२७ मध्ये वाढून १२ हजार ६३७ झाले आहेत. यातही मुलींचा ओघ लक्षणीय वाढल्याचे दिसत आहे.
प्रथम वर्ष जागांपैकी दुसऱ्या वर्षासाठी १० टक्के जागा राखीव असतात. त्यामुळे पुरेशा जागा उपलब्ध होतात व पहिल्या वर्षी प्रवेश घेऊन सोडून गेलेल्या विद्यार्थ्यांची जागा पण मिळते. तसेच मागासवर्गीय आरक्षणासह प्रवेशाची दारे खुली असतात. यामुळे पहिल्या वर्षीच्या तुलनेत थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश घेणाऱ्यांची संख्या वाढताना दिसत आहे.
काय आहे पात्रता
पॉलिटेक्निक डिप्लोमा, मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी.एस्सी. पदवी (बारावीत गणित विषय आवश्यक) तसेच त्याच गुणांच्या अटींसह, अथवा संबंधित शाखेत तीन वर्षांचा डी.व्होक. अभ्यासक्रम पूर्ण केलेले विद्यार्थी थेट दुसऱ्या वर्षी अभियांत्रिकी पदवी प्रवेशासाठी पात्र ठरतात. पीसीआय मान्यताप्राप्त संस्थेतून डी.फार्म. अभ्यासक्रम उत्तीर्ण असलेल्या फार्मसी पदवी अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षाला प्रवेश मिळतो.
मुलींची टक्केवारी वाढली....
अभियांत्रिकीच्या थेट द्वितीय वर्ष प्रवेशात २०२३-२४ मध्ये १०,६३५ मुलींनी प्रवेश घेतला. २६-२७ मध्ये ही संख्या २०,८५९ झाली. तीन वर्षांत मुलींचे प्रवेश १०,२२४ ने वाढले.
तर २०२३-२४ मध्ये फार्मसीमध्ये ४,२६३ मुलींनी प्रवेश घेतला. २०२६-२७ मध्ये ही संख्या ७,२९० झाली. तीन वर्षांत ३,०२७ मुलींची वाढ झाली. यंदा फार्मसीच्या थेट द्वितीय वर्ष प्रवेशात मुलींची संख्या मुलांपेक्षा १,९४३ ने अधिक आहे.