

Sanjay Raut book Narkatala Swarg
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या 'नरकातला स्वर्ग' पुस्तकातून अनेक गौप्यस्फोट केले आहेत. शनिवारी या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. त्यापूर्वी या पुस्तकातील खळबळजनक खुलासे समोर आले आहेत. गुजरात दंगली प्रकरणात नरेंद्र मोदी आरोपी तर खून प्रकरणात अमित शहा आरोपी होते. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांनी कायद्याच्या चौकटीबाहेर मोदी- शहा यांना मदत केली. युपीए सरकारच्या काळात बाळासाहेबांमुळे मोदी- शाह यांची अटक टळली, असा दावा संजय राऊत यांनी त्यांच्या पुस्तकातून केला आहे.
'अमित शाह यांना बाळासाहेब ठाकरे तुम्हाला मदत करु शकतात, असे सुचवण्यात आले होते. त्यावेळी जय शाह लहान होते. त्यांना घेऊन अमित शाह मुंबईत आले. त्यांना बाळासाहेबांना भेटण्यासाठी प्रतीक्षा करावी लागली. अखेर त्यांनी बाळासाहेबांची भेट घेतली. त्यांनी मदतीसाठी याचना केली. त्यानंतर तत्त्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या फोनवरुन बाळासाहेबांनी महत्त्वाच्या व्यक्तीला फोन केला. तुम्ही कुठल्याही महत्त्वाच्या पदावर असाल पण तुम्हीही हिंदू आहात, हे विसरु नका, असे बाळासाहेबांच्या संवादातील शेवटचे वाक्य होते. एका फोनमुळे अमित शाह यांच्या अडचणी दूर झाल्या,'' असे संजय राऊत यांनी लिहिले आहे.
दरम्यान, संजय राऊत यांनी त्यांच्या 'नरकातला स्वर्ग' पुस्तकावर बोलताना म्हटले आहे की, मी त्याला गौप्यस्फोट म्हणत नाही. पुस्तक उद्या येत आहे. हे तुरंगातले अनुभव आहेत. भूतकाळात ज्या घटना घडल्या, त्या गोष्टींचा उल्लेख पुस्तकात आहे. शरद पवार आणि बाळासाहेब यांनी त्यांना कशी मदत केली? मी अनेक गोष्टी पाहिल्या, ऐकल्या, अनुभवल्या.. ते या पुस्तकात आहे. बाळासाहेबांचे सगळ्यांशी आदराचे संबंध होते. बाळासाहेब आमच्याशी बोलणे ही अधिकाऱ्याच्यांसाठी मोठे होते.
मी मर्यादा पुरुषोत्तम रामाचा भक्त आहे. मी अजून काही लिहू शकलो असतो. तुरुंगातील भिंतीशी बोलतो तसे हे आहे, असे राऊत यांनी सांगितले.
शरद पवार आणि बाळासाहेबांनी तुम्हाला चौकटीच्या बाहेर जाऊन मदत केली आणि तुम्ही काय केले, असा सवाल राऊत यांनी केला. पुस्तक खूपं मोठं आहे. तुरुंगातले अनुभव वाचा... तुम्ही फक्त मोदी आणि अमित शहा यांच्यात राहू नका, असेही त्यांनी नमूद केले.
राज ठाकरे यांच्याबाबत बोलताना त्यांनी सांगितले, राज ठाकरे यांनी फोन जरी केला असता तर आधार वाटला असता. आमच्या कुटुंबावर डोंगर कोसळला होता.