

मुंबई : पंधरा हजार रुपयांच्या लाचप्रकरणी पोलीस शिपाई राजेंद्र शिवाजी व्यवहारे आणि खासगी व्यक्ती राजसिंग शिवकुमार सिंग या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. या गुन्ह्यांत अन्य एक पोलीस शिपाई राजेंद्र सर्जेराव आंबीलवाड हा पळून गेला आहे. या कारवाईने व्ही. पी रोड पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचारी वर्गात एकच खळबळ उडाली होती.
यातील तक्रारदार विदेशी सिगारेटची विक्री करतात. गेल्या आठवड्यात त्यांना व्ही. पी रोड पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई राजेंद्र व्यवहारे आणि राजेंद्र आंबीलवाड यांनी ताब्यात घेतले होते. त्यांच्यावर विदेशी सिगारेटची विनापरवाना विक्री केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन कारवाईची धमकी दिली होती.
ही कारवाई टाळण्यासाठी त्यांनी त्यांच्याकडून 40 हजार आणि दरमहा 10 हजाराच्या लाचेची मागणी केली होती. ही लाच दिली नाहीतर त्यांच्यावर कारवाईची धमकी देण्यात आली होती. त्यामुळे त्यांनी लाच देण्याची तयारी दर्शवून त्यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती.
या तक्रारीची तीन दिवस शहानिशा
करण्यात आली होती. त्यात त्यांनी लाचेची रक्कम राजसिंग याच्याकडे देण्यास सांगितले होते. गुरुवारी या अधिकाऱ्यांनी तिथे सापळा लावून रामसिंगला पंधरा हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले. चौकशीत त्याने लाचेची रक्कम राजेंद्र व्यवहारे आणि राजेंद्र आंबीलवाड यांच्या सांगण्यावरुन घेतल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर राजेंद्र व्यवहारे यांना पोलिसांनी अटक केली तर राजेंद्र आंबीलवाड हा कारवाईनंतर पळून गेला होता. त्याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.