PM Modi Birthday: मोदींच्या वाढदिवशी महाराष्ट्रातील लाभार्थी घराघरात लावणार ‘आशीर्वादाचा दिवा’; भाजपची मोहीम

सुमारे बारा कोटी लोकसंख्येच्या महाराष्ट्रात मोदी सरकारच्या योजनांचे तब्बल ७ कोटींहून अधिक लाभार्थी आहेत.
PM Modi
PM Modi File Photo
Published on
Updated on

मृणालिनी नानिवडेकर

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७६ व्या वाढदिवसानिमित्त प्रत्येक लाभार्थ्याने घरी दिवा लावावा अशी योजना भारतीय जनता पक्षाने आखली आहे. महाराष्ट्रातील जवळपास साडेसात कोटी जनता मोदी सरकारची लाभार्थी असल्याने गुरुवारी महाराष्ट्रातील किमान पावणेदोन कोटी घरांत कृतज्ञतापूर्वक अभीष्टचिंतन करणारा दिवा लागणार आहे.

सुमारे बारा कोटी लोकसंख्येच्या महाराष्ट्रात मोदी सरकारच्या योजनांचे तब्बल ७ कोटींहून अधिक लाभार्थी आहेत. सरकारकडे यासंबंधीची आकडेवारी तयार असून खातेनिहाय योजना आणि लोकसभेत वेळोवेळी दिलेल्या उत्तरांनुसार ही आकडेवारी तयार झाली आहे.

शुभेच्छांचा दिवा घरोघरी

भारतीय जनता पक्षाने कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत मोदींच्या वाढदिवसाचा संदेश पोहोचवण्याची मोहीम राबवली आहे. या प्रत्येक घरात उद्या मोदींच्या पुढच्या वाटचालीला शुभेच्छा देणारा दिवा लागावा अशी पक्षाची योजना असल्याचेे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या कार्यालयाने सांगितले.

सात कोटी जनतेला आयुष्यमान कार्ड

महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक लाभार्थी उपलब्ध आकडेवारीनुसार आहेत ते आयुष्यमान भारत या योजनेचे. सरकारी आकडेवारीनुसार ७.१ कोटी जनतेची आयुष्यमान कार्ड तयार आहेत. या योजनेमुळे लाभार्थ्यांना स्वस्त दरात सेवा मिळण्याची योजना राबवली जाते.

PM Modi
PM Narendra Modi Schoolmate: मोदींची भेट अन् जमीन वादाला वेग! वर्गमित्राला मोठा दिलासा; भाजप नेत्याच्या कंपनीची माघार

१.६८ कोटी कुटुंबांना मोफत धान्य

दुसरी मोठी योजना आहे गरीब कल्याण. त्याअंतर्गत १.६८ कोटी कुटुंबांना मोफत धान्य मिळते. प्रत्येक घरात होणारे माणसी लाभ लक्षात घेता सुमारे सात कोटी जनता या योजनेची लाभार्थी आहे. शहरी आणि ग्रामीण भागात यातील प्रत्येक लाभार्थी कुटुंबापर्यंत भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून पणती पोहोचवण्यात आली असून एक दिवा मोदींसाठी उद्या घराघरात लागावा, यासाठी संपर्क केला जात आहे.

१.७० कोटी जनतेसाठी मुद्रा योजना

गरिबांमध्ये या योजना लोकप्रिय असतानाच मध्यमवर्गीय उत्पन्न गटाला मुद्रा योजनेचा मोदी सरकारच्या काळात मोठा लाभ झाला असे मानले जाते.मुद्रा योजनेअंतर्गत महाराष्ट्रात १.७० कोटी खाती उघडली गेली आहेत. यातील किती खात्यांनी प्रत्यक्ष कर्ज घेतले आणि कितींने ते फेडले याबद्दल वाद होत असतात. वसुलीची माहिती उपलब्ध नाही; मात्र किती लाभार्थी आहेत, याचे आकडे तयार आहेत.

३ कोटी ७८ लाख जनधन खाती

जनधन योजना हीदेखील मोदी सरकारच्या काळातील अत्यंत महत्त्वाची योजना असून त्यामुळे महाराष्ट्रातील ३ कोटी ७८ लाख जनतेला लाभ मिळाला असे आकडे सांगतात. माध्यान्ह भोजन योजना पोषण आहाराअंतर्गत महाराष्ट्रातील ९८ लाख ९३ हजार मुलांना शाळेत भोजन पुरवले जाते आहे. किसान सन्मान योजने अंतर्गत ९२.८९ लाख शेतकऱ्यांना पगारासारखी रक्कम महिन्याला थेट खात्यात पोहोचवली जाते.

प्रधानमंत्री आवास योजना

या सर्व योजनांबरोबरच प्रधानमंत्री आवास योजना ही सर्वात महत्त्वाची योजना असून शहरी भागामध्ये या योजनेचे लाभार्थी मोठ्या प्रमाणात वाढावेत यासाठी गेली काही वर्षे प्रयत्न सुरू होते. सूर्यघर योजना, स्वनिधी फेरीवाले योजना, विश्वकर्मा योजना या अंतर्गतही जनतेला लाभ मिळाला आहे.

PM Modi
Medical Admission 2026: बीएएमएस, बीएचएमएस, बीयूएमएस प्रवेश नोंदणी सुरू; १८ सप्टेंबरपर्यंत अर्जाची मुदत

अंत्योदयावर मोदी यांची श्रद्धा

जनतेने पंतप्रधान म्हणून मोदी यांना नेतेपद तर दिलेच शिवाय ते लाखो नागरिकांना घरातील व्यक्ती वाटतात. त्यामुळे त्यांच्या भल्यासाठी राबणाऱ्या नेत्याचा कृतज्ञ वाढदिवस साजरा केला जाणार आहे. भाजपच्या प्रवक्त्या श्वेता शालिनी यासंदर्भात बोलताना म्हणाल्या, सर्वाधिक गरीब जनतेपर्यंत पोहोचणाऱ्या अंत्योदयावर मोदी यांची श्रद्धा आहे.

जनतेप्रति सेवा सुविधा आणि संवेदना ही त्रिसूत्री घेऊन ते समाजात पोहोचतात. लाभार्थ्यांचा योजनानिहाय आकडा तयार असल्याने महाराष्ट्रातील ७ कोटी जनतेपर्यंत सरकारी योजनेचे लाभ पोहोचले आहेत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. गरीब आणि मागास वर्गासाठी माझे सरकार असल्याचे नरेंद्र मोदी सातत्याने सांगत असतात.

भाजपशी संबंधित एका अभ्यासकानुसार सरकारने सुरू केलेल्या योजना या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या का, याचे वस्तुनिष्ठ अहवालही मागवले जात असतात. या सर्व नागरिकांना मोदींच्या कारकिर्दीबद्दल अभिमान असून ते पणती लावतील आणि आवडत्या नेत्याचे अभीष्टचिंतन करतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news