Petrol Shortage: राज्यात पेट्रोल पंपांवर रांगा, अनेक ठिकाणी तुटवडा

खरीप हंगामाच्या तोंडावरच डिझेलचा तुटवडा शेतकऱ्यांची मोठी गैरसोय करणार आहे.
Petrol Shortage
Petrol ShortagePudhari
Published on
Updated on

मुंबई: पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मंगळवारी दुसऱ्यांदा वाढ झाल्याने इंधन दरवाढीचे आर्थिक संकट उभे राहिले असतानाच राज्यातील अनेक जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा जाणवत असून, बहुतांश पंपांवर मोठ्या रांगा लागल्याचे चित्र आहे.

अनेक पंपांवर पेट्रोल आणि डिझेल उपलब्धच नसल्याने ग्राहकांना मनस्ताप होत आहे. खरीप हंगामाच्या तोंडावरच डिझेलचा तुटवडा शेतकऱ्यांची मोठी गैरसोय करणार आहे.

मुंबई आणि ठाणे परिसरात पेट्रोल-डिझेलचा पुरवठा पूर्णपणे ठप्प झाला नसला, तरी टंचाईच्या भीतीने वाहनधारकांनी मंगळवारी दुपारनंतर पेट्रोल पंपांवर गर्दी करण्यास सुरुवात केली. महामार्गालगतच्या पंपांवर वाहनांच्या रांगा वाढू लागल्या. कोल्हापूर, चंद्रपूर, वाशीम, अमरावतीसह पुण्यातील पंपांवरही गर्दी होती. नागपूरमध्येही पंपांवर वाहनांच्या रांगा लागल्या.

संभाजीनगरात 22 पंप कोरडे

छत्रपती संभाजीनगर शहरात पेट्रोल आणि डिझेलच्या पुरवठ्यात अचानक मोठी घट झाली आणि तब्बल 22 पेट्रोल पंप पूर्णपणे रिकामे (ड्राय) झाले. यामुळे सुरू असलेल्या पेट्रोल पंपांवर मंगळवारी सकाळपासूनच प्रचंड गर्दी झाली व वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.

Petrol Shortage
Auto Driver Clash: प्रवासी मिळवण्याची स्पर्धा रिक्षाचालकाच्या बेतली जिवावर; दोन गटांत हाणामारी

वाशिममध्ये सलग पाचव्या दिवशी वाहनचालकांच्या डिझेलसाठी रांगा लागल्याचे चित्र आहे. सोमवारी दुपारनंतर अनेक पेट्रोल पंपांवर डिझेलपुरवठा सुरळीत होण्यास सुरुवात झाली होती. मात्र, मागणी अधिक आणि पुरवठा कमी होत असल्याने रांगा कायम आहेत.

जालनामध्ये 48 पेट्रोल पंप बंद

जालना जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलची तीव्र टंचाई निर्माण झाल्याने वाहनधारकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. महिनाभरानंतर पुन्हा एकदा जिल्ह्यातील जवळपास 80 पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसू लागल्या आहेत, तर साठा संपल्यामुळे तब्बल 48 पेट्रोल पंप पूर्णपणे बंद झाले आहेत.

बुलडाण्यात इंधनटंचाईचा सहावा दिवस

बुलडाणा जिल्ह्यात अभूतपूर्व इंधनटंचाई निर्माण झाली असून डिझेल मिळत नसल्याने शेतीची कामे खोळंबली आहेत. ट्रॅक्टरसाठी डिझेल मिळत नसल्याने सहाव्या दिवशीही शेतकरी आणि वाहनधारकांना पेट्रोल पंपांवर रांगेत उभे राहावे लागत आहे. अनेक ठिकाणी डिझेल न मिळाल्याने अनेक शेतकरी संतप्त झाले आहेत. सोमवारी रात्री जिल्ह्यातील 166 पेट्रोल पंपांपैकी फक्त 22 पेट्रोल पंपांवर डिझेल उपलब्ध होते.

Petrol Shortage
Mumbai Blood Shortage: मुंबईत रक्ताचा तुटवडा गंभीर; अनेक सरकारी रक्तपेढ्या ‌‘रेड झोन‌’मध्ये

प्रशासनाचे आवाहन

दरम्यान,पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचा पुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांनी घाबरून जाऊन गरजेपेक्षा जास्त डिझेल किंवा पेट्रोलचा साठा करू नये, जेणेकरून सर्वांना आवश्यकतेनुसार इंधन मिळू शकेल, असे आवाहन प्रत्येक जिल्ह्यातील प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news