

कोपरखैरणे: नवी मुंबईतील रिक्षाचालकांमधील प्रवासी मिळवण्याच्या स्पर्धेतून अखेर एका रिक्षाचालकाचा जीव गेला. घणसोली स्टेशनबाहेरील थांब्यावर भाडे घेण्यावरून झालेल्या वादातून दोन गटांत हाणामारी झाली. यात चाकू हल्ल्यात जखमी रिक्षाचालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याप्रकरणी चार जणांविरोधात हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
आयान शेख (वय 18) या रिक्षाचालकाची हत्या झाली असून आदिल शेख आणि राजेंद्र वाशीवाले हे दोन रिक्षाचालक जखमी आहेत. स्वप्नील सुर्वे, प्रमोद मानकर, सुब्या उर्फ सुभाष जाधव आणि सत्या उर्फ सतीश अशी संशयित आरोपींची नावे आहेत. यातील स्वप्नील आणि प्रमोद यांना रात्री उशीरा अटक करण्यात आली आहे. तर अन्य दोघांचा शोध सुरू आहे.
घणसोली स्टेशनच्या शेअर रिक्षांचा थांबा आहे. 18 मे रोजी दुपारी तीनच्या सुमारास प्रवासी घेण्यावरू संशयित आरोपी आणि फिर्यादी यांच्यात वाद झाले. वाद हाणामारीपर्यंत गेला. यात लाठीकाठी, दगडाचा वापर करण्यात आला.
फिर्यादी आदिल याने भाऊ आयान शेख याला बोलावून घेतले. भांडणे सोडवण्यास आलेला आयान याच्यावर आरोपींनी चाकूचा वार केला. त्यात तो गंभीर जखमी झाला. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंद करीत स्वप्नील सुर्वे, प्रमोद मानकर यांना अटक केली. अन्य दोघांचा शोध सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गवळी यांनी दिली.