मुंबई : परळ-शिवडीतील नगरसेवकांना लालबागचा राजा पावला असून येथील बहुतांश प्रभागात आरक्षणच पडले नाही. त्यामुळे शिवसेना (उबाठा) च्या माजी नगरसेवकांना पुन्हा नगरसेवक बनण्याची संधी मिळणार आहे. एवढेच नाही तर ठाकरे गटासाठी ही जमेची बाजू आहे.
परळ, शिवडी हा भाग सुरुवातीपासून ठाकरे गटाचा बालेकिल्ला राहिला आहे. विशेष म्हणजे शिवसेनेमध्ये मोठी फूट पडल्यानंतरही या भागातील माजी नगरसेवकांसह शिवसैनिक ठाकरेंसोबतच राहिले. त्यामुळे शिवडी विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेचे बाळा नांदगावकर यांचे आवाहन असताना अजय चौधरी यांना विजय मिळवता आला. शिवडी विधानसभेतील 202 ते 206 या पाच प्रभागांत 2017 मध्ये शिवसेनेचे नगरसेवक निवडून आले होते.
शिवसेना फुटीनंतर हे पाचही नगरसेवक ठाकरेंसोबतच राहिले. परंतु मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग आरक्षणांमध्ये आपला प्रभाग गमावण्याची भीती या नगरसेवकांना वाटत होती. प्रभाग गमावल्यास आपल्याला उमेदवारी मिळणार नाही, याचे टेन्शनही त्यांना होते. परंतु प्रभाग आरक्षणामध्ये पाचही प्रभागांतील आरक्षण फारसे बदलले नाही.
मुंबईच्या माजी महापौर श्रद्धा जाधव 2017 मध्ये सर्वसामान्य महिला आरक्षणातून लढल्या होत्या. यावेळी हा प्रभाग सर्वसामान्य झाला आहे. त्यामुळे जाधव यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 203 प्रभाग सर्वसामान्य महिला होता. तो प्रभाग नवीन आरक्षणामध्ये सर्वसामान्य महिलाच राहिला आहे. त्यामुळे माजी नगरसेविका सिंधू मसूरकर यांना पुन्हा संधी मिळू शकते.
204 प्रभागही 2017 प्रमाणे यावेळीही सर्वसामान्य प्रवर्गात राहिल्यामुळे शिवसेनेचे सोलापूर संपर्कप्रमुख माजी नगरसेवक अनिल कोकीळ यांनाही पुन्हा संधी मिळणार आहे. 206 प्रभागातील माजी नगरसेवक सचिन पडवळ यांचा प्रभागही सर्वसामान्य झाल्यामुळे त्यांनाही पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ नगरसेवक रमाकांत रहाटे यांचा 208 प्रभाग मात्र ओबीसी झाल्यामुळे त्यांची उमेदवारी धोक्यात येऊ शकते.
ठाकरेंशी एकनिष्ठ राहिल्यामुळे पुन्हा उमेदवारी
उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिल्यामुळे परळमधील माजी नगरसेवकांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच संकेतही त्यांना मातोश्रीतून मिळाल्याचे सांगण्यात येत आहे.