

मुंबई : केसचा निकाल बाजूने पारित करण्यासाठी 25 लाखांची मागणी करून 15 लाखांची लाच घेतल्याप्रकरणी माझगाव येथील विशेष सत्र न्यायालयाच्या कोर्ट क्रमांक चौदाचे लिपिक चंद्रकात हनमंत वासुदेव यांना मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली.
तक्रारदार व्यावसायिक असून त्यांच्या पत्नीच्या जागेवर अनधिकृतपणे कब्जा करण्यात आला होता. त्यामुळे त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र या याचिकेतील रक्कम दहा कोटींपेक्षा कमी असल्याने त्याची याचिका माझगाव येथील विशेष सत्र न्यायालयात वर्ग करण्यात आली होती. या याचिकेवर अतिरिक्त सत्र न्यायाधीश एजाजुद्दीन काझी यांच्या न्यायालयात सुनावणी सुरू होती.
याच सुनावणीसाठी तक्रारदार 9 सप्टेंबरला उपस्थित होते. यावेळी त्यांना न्यायालयाचे लिपिक चंद्रकांत वासुदेव यांनी कॉल करून भेटण्यास सांगितले होते. त्यामुळे 12 सप्टेंबरला ते चंद्रकातला त्यांच्या न्यायालयीन चेंबर्समध्ये भेटले. यावेळी त्याने त्यांच्याकडून केसचा निकाल बाजूने देण्यासाठी 25 लाखांची मागणी केली होती. मात्र ही रक्कम जास्त असल्याने त्यांनी त्यास नकार दिला होता. त्यानंतर चंद्रकांत त्यांना सतत कॉल करून विचारणा करत होते. लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी त्यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती.
10 नोव्हेंबरला ही तक्रार प्राप्त होताच या अधिकाऱ्यांनी त्याच दिवशी तक्रारीची शहानिशा केली होती. यावेळी चंद्रकांत यांनी केसचा निकाल बाजूने पारित करण्यासाठी 25 लाखांची मागणी करून तडजोडीनंतर पंधरा लाख रुपये देण्यास सांगितले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी या अधिकाऱ्यांनी तक्रारदारांना लाचेची रक्कम देऊन पाठवून दिले होते. ठरल्याप्रमाणे तक्रारदारांनी पंधरा लाख रुपये तक्रारदारांना दिले. त्यानंतर त्यांनी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एजाजुद्दीन काझी यांना कॉलवरून पैसे मिळाल्याचे सांगितले होते. त्यांनीही त्यास संमती दर्शविली. या घटनेनंतर चंद्रकांत यांना लाचेच्या रकमेसह एसीबीच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले.
याप्रकरणी त्याच्यासह एजाजुद्दीन काझी यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत अटक केलेल्या चंद्रकांत वासुदेव यांना बुधवारी दुपारी विशेष सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याच गुन्ह्यांत एजाजुद्दीन काझी यांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्यांची लवकरच या अधिकाऱ्यांकडून चौकशी होणार आहे.
केस निकाल बाजूने देण्यासाठी न्यायाधीशांच्या वतीने लिपिकालाच पंधरा लाखांची लाच घेताना अटक करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. चालू वर्षातील ही आतापर्यंत सर्वांत मोठी कारवाई असल्याचे न्यायालयीन वर्तुळात म्हटले जाते.
चंद्रकांत यांना विशेष सत्र न्यायालयाने 16 नोव्हेबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून, याच लाच प्रकरणात अतिरिक्त सत्र न्यायाधीश एजाजुद्दीन सल्लाउद्दीन काझी यांना सहआरोपी दाखविण्यात आले आहे. त्यांची लवकरच संबंधित अधिकाऱ्यांकडून चौकशी होणार आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीशांवरच लाचप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने न्यायालयीन कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.