

मुंबई : आरक्षणामध्ये दिग्गज माजी नगरसेवकांनी आपले प्रभाग गमावले असून आजूबाजूचे प्रभागही आरक्षित झाले आहेत. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या कामकाजाचा दांडगा अनुभव असलेल्या या माजी नगरसेवकांचे राजकीय भवितव्य धोक्यात आले आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी परिमंडळनिहाय प्रभाग आरक्षण काढण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. पण याकडे फारसे गांभीर्याने घेतले जात नसल्यामुळे अनेक अभ्यासू, महापालिकेच्या कामकाजाचा दांडगा अनुभव असलेल्या नगरसेवकांना मुंबईकरांना मुकावे लागत आहे.
मुंबईतील 227 प्रभागांचे एकत्रितरीत्या आरक्षण काढण्यात येत असल्यामुळे एकाच महापालिका विभाग कार्यालयाच्या हद्दीत सलग प्रभाग आरक्षित होतात. त्यामुळे एखाद्या अभ्यासू नगरसेवकाचा प्रभाग आरक्षित झाल्यानंतर त्याला दुसऱ्या प्रभागातही इच्छा असूनही पक्षाला उमेदवारी देता येत नाही. यावेळीही सुमारे 30 वर्षांपेक्षा जास्त अनुभव असलेल्या नगरसेवकांचे प्रभाग आरक्षित झाले आहेत. एवढेच काय तर आजूबाजूचा एकही प्रभाग खुल्या प्रवर्गात गेलेला नाही. त्यामुळे अशा माजी नगरसेवकांना निवडणूकच लढता येणार नाही.
1992 पासून मुंबई महानगरपालिकेमध्ये निवडून येणारे माजी विरोधी पक्षनेता यांना आरक्षणाचा अनेकदा फटका बसला आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी त्यांनी काँग्रेसच्या अंतर्गत वादाला कंटाळून भाजपात प्रवेश केला होता. त्यामुळे भाजपाला एक अभ्यासू नगरसेवक मिळाला होता. त्यामुळे त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती. परंतु आरक्षणामध्ये एफ उत्तर विभाग कार्यालयाच्या हद्दीतील जवळपास 8 प्रभाग आरक्षित झाले.
यात राजा यांच्या प्रभागासह आजूबाजूंच्या प्रभागांचा समावेश आहे. त्यामुळे राजांना आजूबाजूच्या प्रभागातही उमेदवारी मिळण्याचा मार्ग बंद झाला. अशाच प्रकारे ज्येष्ठ नगरसेवक यशवंत जाधव, अतुल शहा, मंगेश सातमकर, राजेश फुलवारिया, जगदीश कुट्टी, स्वप्निल टेंभवलकर, कमलेश यादव व अन्य सात नगरसेवकांचे आजूबाजूचे प्रभागही आरक्षित झाले आहेत. त्यामुळे या नगरसेवकांबद्दल पक्ष काय निर्णय घेणार याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.