Gift Of Life Heart Surgery: हृदयविकार असलेल्या मुलांवर मोफत शस्त्रक्रिया; डॉक्टरांच्या कार्याला गावस्करांचा सलाम

Gift Of Life Heart Surgery: ‘गिफ्ट ऑफ लाइफ’ उपक्रमांतर्गत जन्मजात हृदयविकार असलेल्या ८५० हून अधिक गरजू मुलांवर मोफत हृदयशस्त्रक्रिया करण्यात आल्या.
Gift Of Life Heart Surgery
Gift Of Life Heart SurgeryPudhari
Published on
Updated on

मुंबई : जन्मजात हृदयविकाराने त्रस्त असलेल्या शेकडो चिमुरड्यांना नवजीवन देणाऱ्या ‘गिफ्ट ऑफ लाइफ’ या उपक्रमाने एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. या मोहिमेंतर्गत आतापर्यंत ८५० हून अधिक वंचित आणि गरजू मुलांवर मोफत हृदयशस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आल्या आहेत. या उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्यासाठी आयोजित विशेष कार्यक्रमाला भारताचे माजी क्रिकेटपटू आणि दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर यांनी उपस्थिती लावत मुलांच्या धैर्याला सलाम केला.

जुहू तारा रोड येथील रोटरी सेवा केंद्रात आयोजित कार्यक्रमात शस्त्रक्रिया झालेल्या मुलांशी आणि त्यांच्या पालकांशी संवाद साधताना गावस्कर भावूक झाले. ‘रोटरी क्लब ऑफ बॉम्बे एअरपोर्ट’ आणि ‘श्री सत्य साई संजीवनी सेंटर फॉर चाईल्ड हार्ट केअर’ यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे.

यावेळी बोलताना गावस्कर म्हणाले, “या मुलांना भेटणे हा माझ्यासाठी अत्यंत हृदयस्पर्शी अनुभव आहे. एवढ्या लहान वयात त्यांनी दाखवलेले धैर्य आणि त्यांच्या कुटुंबियांनी दिलेला संघर्ष प्रेरणादायी आहे. रोटरी क्लब आणि डॉक्टरांनी केलेले निस्वार्थ कार्य समाजासाठी आदर्शवत आहे. माझ्या दृष्टीने ही मुलेच खरी हिरो आहेत.”

गेल्या सहा वर्षांत या उपक्रमासाठी सुमारे १२ कोटी रुपयांचा निधी उभारण्यात आला आहे. या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील शेकडो मुलांना अत्यावश्यक हृदयशस्त्रक्रिया आणि वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यापुढेही अधिकाधिक मुलांपर्यंत ही मदत पोहोचवण्याचा संकल्प आयोजकांनी व्यक्त केला.

‘गिफ्ट ऑफ लाइफ’ प्रकल्पाचे अध्यक्ष पीपी नितीन मेहता यांनी सांगितले की, प्रत्येक मुलाला निरोगी आयुष्य जगण्याचा अधिकार आहे. आर्थिक अडचणींमुळे कोणतेही मूल उपचारांपासून वंचित राहू नये, यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत. शस्त्रक्रियेनंतर मुलांच्या चेहऱ्यावर उमटणारे हास्य हेच आमच्या कार्याचे खरे यश आहे.

Gift Of Life Heart Surgery
CBSE CyberAttack : सीबीएसई १२ वी पुनर्मूल्यांकन पोर्टलवर सायबर हल्ला; २ मिनिटांत १५ लाख ‘हिट्स’

‘श्री सत्य साई संजीवनी सेंटर फॉर चाईल्ड हार्ट केअर’च्या बालहृदयविकार शस्त्रक्रिया विभागाच्या प्रमुख डॉ. प्रभाता रश्मी यांनी भारतातील परिस्थितीवर प्रकाश टाकला. त्या म्हणाल्या की, देशात दरवर्षी दोन लाखांहून अधिक मुले जन्मजात हृदयविकार घेऊन जन्माला येतात. त्यापैकी सुमारे ७० हजार मुलांना पहिल्याच वर्षात शस्त्रक्रियेची आवश्यकता असते. मात्र गरिबी, आरोग्य सुविधांचा अभाव आणि उशिरा होणारे निदान यामुळे अनेक मुलांना वेळेवर उपचार मिळत नाहीत.

या मोहिमेला देश-विदेशातील विविध संस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. जर्मनीतील रोटरी क्लब ऑफ बर्लिन इंटरनॅशनल, अमेरिकेतील रोटरी क्लब ऑफ फोर्ट वेन, तसेच मुंबई आणि दिल्लीतील विविध रोटरी क्लब आणि रोटरी इंटरनॅशनलच्या ‘वर्ल्ड फंड’ने या उपक्रमाला पाठबळ दिले आहे.

हृदयविकाराने ग्रस्त असलेल्या मुलांना नवजीवन देत शेकडो कुटुंबांच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण करणारा ‘गिफ्ट ऑफ लाइफ’ उपक्रम आज खऱ्या अर्थाने समाजसेवेचा आदर्श ठरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news