CBSE CyberAttack : सीबीएसई १२ वी पुनर्मूल्यांकन पोर्टलवर सायबर हल्ला; २ मिनिटांत १५ लाख ‘हिट्स’

CBSE CyberAttack : सीबीएसई १२ वी पुनर्मूल्यांकन पोर्टलवर सायबर हल्ला; २ मिनिटांत १५ लाख ‘हिट्स’
Published on
Updated on

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) १२ वीच्या पुनर्मूल्यांकन पोर्टलवर मंगळवारी एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर सायबर हल्ले झाले. पोर्टल सुरू होताच अवघ्या दोन मिनिटांत तब्बल १५ लाख ‘हिट्स’ देऊन यंत्रणा कोलमडवण्याचा प्रयत्न झाला, अशी माहिती मंडळाने दिली. मात्र, सीबीएसईच्या तांत्रिक पथकाने हा हल्ला यशस्वीपणे परतावून लावत पोर्टलचे कामकाज सुरळीत ठेवले.

१२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी मंगळवारी पहाटे ४ वाजल्यापासून पुनर्मूल्यांकन पोर्टल खुले करण्यात आले होते. पोर्टल सुरू होताच काही तांत्रिक अडचणी जाणवल्या. सीबीएसईने दिलेल्या माहितीनुसार, काही समाजकंटकांनी सेवा विस्कळीत करण्यासाठी ‘डिनायल-ऑफ-सर्व्हिस’ (DoS) सारखे सायबर हल्ले केले.

या हल्ल्यादरम्यान अवघ्या दोन मिनिटांत १५ लाख ‘हिट्स’ निर्माण करून सर्व्हर क्रॅश करण्याचा प्रयत्न झाला. एवढेच नव्हे, तर फाईल्समध्ये अनधिकृतपणे प्रवेश करण्याचे एक लाखांहून अधिक प्रयत्नही सायबर गुन्हेगारांनी केले.

सायबर हल्ल्याचे मोठे आव्हान असतानाही तांत्रिक पथकाने दाखवलेल्या तत्परतेमुळे हजारो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला. मंगळवारी दुपारी ३ वाजेपर्यंत १६,००० हून अधिक विद्यार्थ्यांनी गुणपडताळणी आणि पुनर्मूल्यांकनासाठी आपले अर्ज यशस्वीपणे सादर केले आहेत, असे सीबीएसईने स्पष्ट केले.

विद्यार्थ्यांचा त्रास कमी करण्यासाठी आणि सायबर सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी सीबीएसईने तातडीने पावले उचलली आहेत. विद्यार्थ्यांच्या तक्रारींची दखल घेत पोर्टलवरील ‘सेशन टाइम लिमिट’ (सत्राची कालमर्यादा) वाढवण्यात आली आहे, ज्यामुळे अर्ज करताना तांत्रिक अडथळे येणार नाहीत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news