

मुंबई: शाळा प्रशासनाने कोणतीही पूर्वसूचना न देता फेब्रुवारी महिन्यात पाठवलेल्या नोटिसीआधारे येत्या शैक्षणिक वर्षापासून शाळा बंद करणे हे बेकायदेशीर असल्याचे सांगत शिक्षण विभागाने ओशिवऱ्याच्या सिटी इंटरनॅशनल स्कूलला दणका दिला आहे. याबाबत पश्चिम विभागाच्या शिक्षण निरीक्षकांनी शाळा प्रशासनाला पत्र पाठवत शाळा बंद करू नये, असे आदेश दिले आहेत.
ओशिवरा येथे 2003 पासून सिटी इंटरनॅशनल ही शाळा सुरू आहे. शाळा प्रशासनाने यंदा 10 फेब्रुवारी रोजी पालकांना पत्र आणि इमेल पाठवला. यात ही शाळा हे शैक्षणिक वर्ष पूर्ण झाल्यानंतर बंद करत आहोत, असे कळवले होते. मालकाने केलेली भाडेवाढ हे कारण प्रशासनाने पालकांना पत्रात दिले होते.
विद्यार्थ्यांचा शाळा सोडल्याचा दाखला घेऊन इतरत्र प्रवेश घ्यावा, असेही कळवले होते. त्यामुळे पालक अस्वस्थ होते. त्यांनी प्रथम शाळा प्रशासनाकडे धाव घेतली. मात्र त्यांना दाद दिली नाही. त्यामुळे पालकांनी आझाद मैदानात आंदोलन केले. शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांचीही भेट घेत त्यांना या प्रकरणी हस्तक्षेप करायची विनंती केली.
शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिलेल्या निर्देशानुसार, विभागीय शिक्षण उपसंचालक राजेश कंकाळ यांनी पश्चिम विभागाचे शिक्षण निरीक्षक संजय जावीर यांना याबाबत चौकशी करण्याची सूचना केली होती. या प्रकरणात सर्व माहिती घेतल्यावर आता जावीर यांनी शाळा प्रशासनाला पत्र पाठवत शाळा बंद करणे बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे.
पर्यायी व्यवस्था बंधनकारक
राज्याच्या स्वयंअर्थसहाय्यित शाळांसाठीच्या अधिनियमानुसार शाळा सुरू करण्याचा किंवा बंद करण्याचा निर्णय फक्त व्यवस्थापनावर अवलंबून नसून संबंधित प्राधिकरणाला त्याबाबत 18 महिने आगाऊ सूचना देणे क्रमप्राप्त आहे. ही सूचना पालकांनाही 18 महिने आधीच
देणे अपेक्षित आहे. मात्र या शाळेने फेब्रुवारी 2026 मध्ये ही सूचना देत मे 2026 मध्ये शाळा बंद करण्याचे निश्चित केले आहे. हे कृत्य बेकायदेशीर असून विद्यार्थ्यांच्या पर्यायी शैक्षणिक सोयीची खात्री केल्याशिवाय शाळा बंद करता येणार नाही. शिक्षण निरीक्षकांनी पाठवलेल्या या पत्रामुळे पालकांना दिलासा मिळाला आहे.