

मुंबई: नाशिक येथील आयटी कंपनीतील धर्मांतरण प्रकरणी राज्य सरकार कठोर कारवाई करत आहे. एका विशिष्ट मॉड्यलनुसार या गोष्टी घडविण्यात आल्याचे तपासातून समोर आले आहे. त्यामुळे या मॉड्युलच्या तारा आणखी कुठवर पोहचल्या आहेत आणि जोडल्या गेलेल्या आहेत त्याचाही तपास आम्ही करणार तसेच या सर्व प्रकरणी केंद्रीय यंत्रणांनाही माहिती दिली असून त्यांचीही मदत घेतली जाणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.
देवेंद्र फडणवीस हे भाजपच्या प्रचारासाठी पश्चिम बंगालमध्ये आहेत. या दौऱ्यात माध्यमांशी बोलताना त्यांनी नाशिकचे प्रकरण गंभीर आहे. टीसीएस सारख्या कंपनीनेही यावर कठोर भूमिका घेतली आहे. याप्रकरणी कुणालाही पाठीशी घालणार नाही, असे कंपनीने सांगितल्याचे फडणवीस म्हणाले.
पश्चिम बंगालला ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस सरकारने (टीएमसी) आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आणून ठेवले आहे. चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे बंगाल आज ’डेट ट्रॅप’मध्ये अडकला असून, विकासकामांसाठी नव्हे तर कर्जाचे व्याज फेडण्यासाठी या सरकारला नवीन कर्ज काढावे लागत असल्याची भीषण स्थिती निर्माण झाली आहे, असा आरोप फडणवीस यांनी केला.
त्यामुळे ही निवडणूक ममता बॅनर्जी विरुद्ध बंगालची जनता अशी थेट लढाई झाली आहे. बंगालमधील ’कट-मनी’ संस्कृती आणि बिघडलेल्या कायदा-सुव्यवस्थेमुळे 6 हजार 895 उद्योग बंगाल सोडून गेले आहेत. यातील सर्वाधिक उद्योगांनी महाराष्ट्राचा रस्ता धरला आहे.
50 वर्षांपासून बंगालमध्ये कार्यरत असलेल्या कंपन्याही आता गुंतवणुकीसाठी महाराष्ट्राला पसंती देत आहेत, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. यावेळी त्यांनी नाशिक येथील भोंदू अशोक खरात प्रकरणी सुरू असलेल्या तपासाची माहिती दिली.