‌Operation Tiger : ‘ऑपरेशन टायगर‌’साठी शिंदे सेनेच्या हालचाली?

एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीत गाठीभेटी; ठाकरेंचे आठ खासदार संपर्कात असल्याचा दावा : राजकीय चर्चेला उधाण
Operation Tiger
‘ऑपरेशन टायगर‌’साठी शिंदे सेनेच्या हालचाली?file photo
Published on
Updated on

मुंबई ः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली भेटीत शिवसेना ठाकरे गटाच्या आठ खासदारांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश होण्याबाबत चर्चा झाल्याचे समजते. दरम्यान, आठ खासदार पक्ष बदलायला तयार झाल्याशिवाय ते पक्षांतरबंदी कायद्यास पात्र ठरणार नाहीत, असा मुद्दा या चर्चेत आल्याचे समजते.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष मान्यतेबद्दलची सुनावणी अंतिम टप्प्यात असताना असे पाऊल उचलणे योग्य ठरणार नाही, अशी भूमिका मांडण्यात आल्याचे समजते. त्यामुळे ठाकरे गटाचे आठ खासदार शिंदे गटाच्या गळाला लागणार याभोवती सध्या चर्चा सुरू आहे.

दरम्यान, बुधवारी माध्यमांशी बोलताना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ‌‘ऑपरेशन टायगर‌’साठी शिंदे यांना दिल्लीला जाण्याची कोणतीही गरज नाही. ते खासदार स्वतःहूनच संपर्कात येतील, अशी भूमिका घेत ‌‘नरो वा कुंजरोवा‌’ पवित्रा स्वीकारला. मात्र, त्याचवेळी मी माझ्या खात्याचे काम असल्याने दिल्लीला गेलो होतो. तो केवळ योगायोग होता. सध्या कोणतीही मोहीम सुरू नसल्याचेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.

एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यादरम्यान त्यांनी शिवसेना ‌‘उबाठा‌’चे काही खासदार आपल्या पक्षात येण्यास तयार असल्याचे भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाला सांगितल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मुंबईतील दोन खासदार वगळता शिवसेना ‌‘उबाठा‌’तील मंडळींना सत्तेचे वेध लागले आहेत. त्यासाठी ते शिंदे गटाकडे जाण्यास तयार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. ही चर्चा प्रत्यक्षात आणण्यासाठीच शिंदे दिल्लीला गेले होते, असेही बोलले जात होते.

Operation Tiger
Mokhada water scarcity : मोखाड्यातील विहीर भुईसपाट झाल्याने पाणीटंचाई

दिल्ली भेट ही केवळ खासदारांना संबोधित करण्यासाठी होती, असे सांगितले जात असले तरी त्यावर विश्वास न ठेवता माध्यमांमध्ये ‌‘उबाठा‌’चे सहा खासदार शिंदे सेनेकडे येणार, ‌‘ऑपरेशन टायगर‌’ होणार, अशी चर्चा सुरू झाली होती. महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत हेही शिंदे यांच्यापाठोपाठ दिल्लीला पोहोचल्यामुळे या चर्चेला आणखीनच बळ मिळाले.

विधानसभा निवडणुकांच्या तयारीत भारतीय जनता पक्षाची संघटना गुंतली असताना अशाप्रकारचे ‌‘ऑपरेशन टायगर‌’ करणे शक्य आहे काय? याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. तर, दुसरीकडे राज्यांच्या निवडणुकांना सामोरे जाताना भारतीय जनता पक्षाकडे येणाऱ्या खासदार, आमदारांची संख्या वाढते आहे, हे दाखवण्यासाठी हा उपक्रम आताच राबवला जाईल, अशीही चर्चा आहे. सध्या तरी अशाप्रकारची कोणतीही घडामोड अपेक्षित नसून, शिंदे यांची दिल्ली भेट नेहमीचा संपर्क भाग होता, असे त्यांच्या विश्वासू मंडळींतर्फे सांगितले जाते आहे.

विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरे यांचे नाव

विधान परिषदेतील निवृत्त होणाऱ्या 9 सदस्यांच्या जागांसाठी एप्रिल-मेदरम्यान मतदान होईल. महाविकास आघाडीला संख्याबळाच्या आधारावर जेमतेम एक जागा जिंकता येईल. ही जागा उद्धव ठाकरे यांनी घ्यावी, पक्षप्रमुख या नात्याने काँग्रेसला ती जागा त्यांना द्यावी लागेल, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.

मात्र, अशावेळी काँग्रेसने माघार घेतली नाही तर एका आमदारकीच्या जागेसाठी पडते घ्यावे का, असाही विचार ठाकरे यांच्या जवळच्या काही मंडळींनी समोर आणला आहे. येत्या सोमवारी (दि. 23) निवृत्त होणाऱ्या सदस्यांचा निरोप समारंभ आहे. उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीचा तसेच त्यांच्या संसदीय कामगिरीचा आढावा यावेळी घेतला जाईल. त्याआधीच उद्धव ठाकरे यांनी मी पुन्हा येईन असे म्हणावे, अशी इच्छा त्यांच्यापुढे मांडली जाते आहे.

उद्धव ठाकरे यांनी पुन्हा आमदार व्हावे, यासाठी साकडे

शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा विधान परिषदेतील सदस्यत्वाचा कार्यकाळ संपतो आहे. विधिमंडळ किंवा संसदीय राजकारणात आपले मन रमत नाही, ही ठाकरे घराण्याची परंपरा नाही, असे उद्धव ठाकरे यांचे व्यक्तिगत मत आहे. आता आमदारकी पुरे झाली, पुन्हा ही भूमिका नको, असे मत त्यांनी व्यक्त केले असताना पक्षप्रमुखांनी विधिमंडळात असणे आवश्यक असल्याने त्यांनी निर्णय बदलावा, अशी मनधरणी त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरू केली आहे.

निवडणूक समितीच्या बैठकीसाठी फडणवीस दिल्लीत

भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारी सायंकाळी दिल्लीत दाखल झाले आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची नुकतीच घोषणा केली आहे. तामिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीच्या या निवडणुकांबाबत विविध निर्णय घेण्यासाठी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची ही बैठक आहे. भाजपची निवडणुकीसंदर्भातील ही सर्वोच्च समिती असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यासह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची ही समिती आहे. या समितीत मुख्यमंत्री फडणवीसांचा समावेश असल्याने दिल्ली दौरा स्वाभाविक असल्याचे भाजपमधील सूत्रांचे म्हणणे आहे.

Operation Tiger
MBMC healthcare crisis : मिरा-भाईंदर महापालिकेत डॉक्टरांची वानवा

अरविंद सावंत, अनिल देसाई वगळता अन्य खासदार अनुकूल

गेले काही दिवस उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील ठाकरे शिवसेनेमधील काही खासदार आणि आमदार पक्ष बदलू शकतील, भारतीय जनता पक्ष किंवा शिवसेना शिंदे गटात जाऊ शकतील, अशी भीती व्यक्त केली जाते आहे. राजकारणातील घडामोडींशी संबंधित असलेल्या काही बड्या नेत्यांच्या मतानुसार, अरविंद सावंत आणि अनिल देसाई वगळता अन्य खासदारांना सत्तेच्या जवळ जायचे आहे, असे सांगितले जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news