MBMC healthcare crisis : मिरा-भाईंदर महापालिकेत डॉक्टरांची वानवा

स्थायी डॉक्टरांची ३५ पदे रिक्त, तर अस्थायी डॉक्टरांची ११० पदे रिक्त
MBMC healthcare crisis
MBMC pudhari photo
Published on: 
Updated on: 

भाईंदर : राजू काळे

मिरा-भाईंदर महापालिकेत स्थायी डॉक्टरांची एकूण ११७ मंजूर पदांपैकी केवळ ८२ पदे भरण्यात आली असून ३५ पदे रिक्त आहेत. तर अस्थायी डॉक्टरांची एकूण २३० मंजूर पदांपैकी १२० पदे भरण्यात आली असून ११० पदे रिक्त असल्याचे समोर आल्याने पालिकेत डॉक्टरांची वानवा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मिरा-भाईंदर शहराची लोकसंख्या सुमारे १३ लाखांवर गेली आहे. शहरात वाहनांची संख्या वाढली असून रस्ते अपुरे ठरत आहेत. यामुळे वाहतूक कोंडी नित्याची झाली असून विविध प्रकल्प शहरात राबविले जात आहेत. अशा परिस्थितीत अपघाताचे प्रमाण वाढत असतानाच शहरात वायू प्रदूषणाचे प्रमाण देखील वाढत आहे. वातावरणात सततच्या बदलामुळे रुग्णांची संख्या सतत वाढत आहे.

अशा रुग्णांवर उपचारासाठी शहरात २०० खाटांचे भारतरत्न स्व. पंडित भीमसेन जोशी शासकीय सामान्य रुग्णालय, पालिकेचे ५० खाटांचे भारतरत्न स्व. इंदिरा गांधी रुग्णालय व ११ नागरी आरोग्य केंद्रे, ३५ आरोग्यवर्धिनी केंद्रे, ११ हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, १०० खाटांचे मातोश्री इंदिराबाई बाबुराव सरनाईक कॅशलेस रुग्णालय असून काही खासगी रुग्णालये, दवाखाने उपलब्ध आहेत.

MBMC healthcare crisis
Shahapur Ashram school : शहापुरात आश्रमशाळांची परिस्थिती चिंताजनक

यातील खासगी रुग्णालये व दवाखान्यांमध्ये सामान्य तसेच गरीब व गरजू रुग्णांना महागडे उपचार घेणे परवडत नसले तरी शासनाने केशरी रेशनकार्ड धारकांना महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य अभियानांतर्गत ५ लाखांपर्यंतचे उपचार मोफत उपलब्ध करून दिले आहेत. या उपचारांचा खर्च शासनाकडून संबंधित रुग्णालयांना अदा केला जातो. मात्र शासनाकडून उपचाराच्या रकमेस विलंब लागत असल्याने शहरातील अनेक खासगी रुग्णालयांत मोफत उपचार नाकारले जातात.

अशावेळी शहरातील कॅशलेस रुग्णालय रुग्णांसाठी आधारवड ठरत असले तरी त्यात शहरातील रुग्णांवरच मोफत उपचार केले जातात, शहराबाहेरील तसेच गंभीर रुग्णांवरील उपचार सशुल्क केले जात असल्याचे अनेकदा समोर आले आहे. मात्र शहरातील गरीब, गरजू व सामान्य रुग्णांकडून शासकीय व पालिका रुग्णालयातील उपचारांना सर्वाधिक पसंती दिली जाते.

यानुसार शहरात असलेले हे शासकीय रुग्णालय सध्या वादातिक ठरू लागल्याने रुग्णांना पालिकेचे गांधी रुग्णालय पर्याय ठरते. मात्र या रुग्णालयात केवळ माता व बाल संगोपन केले जात असून त्यात बाह्य रुग्ण विभाग सुरू आहे.

दरम्यान ११ नागरी आरोग्य केंद्रांमध्ये ओपीडी व सर्व राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम राबविले जातात. पालिकेत डॉक्टरांची पुरेशी संख्या उपलब्ध नसल्याने या केंद्रांमध्ये रोटेशन अथवा काही तासांकरिता कार्यरत डॉक्टरांकडून रुग्ण सेवा दिल्या जातात.

शहरामध्ये ३५ आरोग्यवर्धिनी केंद्रे असून त्यामध्ये केवळ ६ डॉक्टरांकडूनच रुग्ण सेवा दिल्या जातात. यामुळे हे केंद्रे दिवसाआड अथवा दोन दिवसाआड रुग्णांसाठी खुले असतात. याखेरीज शहरामध्ये ११ आपला दवाखाना असून यातील ३ दवाखाने पालिकेकडून चालविले जातात तर ७ दवाखाने हे शासनाने नियुक्त केलेल्या मेसर्स एचएलएल या संस्थेकडून मोफत चालविले जातात.

MBMC healthcare crisis
BMC printing press scam : पालिका प्रिंटिंग प्रेसमध्ये 6 कोटी 60 लाखांचा घोटाळा!

दरम्यान पालिकेकडून चालविण्यात येणाऱ्या आपला दवाखान्यात रुग्णांकडून केसपेपरचे ५ रुपये शुल्क वसूल केले जातात तर उपचार मात्र निःशुल्क केले जातात. पालिकेत ५० खाटांचे गांधी रुग्णालयासह ११ नागरी आरोग्य केंद्रे, ३५ आरोग्यवर्धिनी केंद्रे व ११ आपला दवाखाना चालविण्यासाठी ८२ स्थायी डॉक्टरच कार्यरत असून ३५ डॉक्टरांची पदे रिक्त आहेत.

खासगी दवाखान्यांचा खर्च अधिक

स्थायी डॉक्टरांची एकूण ११७ पदे मंजूर असून अस्थायी डॉक्टरांची एकूण २३० पदे मंजूर आहेत. अस्थायी डॉक्टरांच्या मंजूर पदांपैकी आत्तापर्यंत १२० पदेच भरण्यात आली असून ११० पदे अद्यापही रिक्त ठेवण्यात आल्याचे समोर आले आहे. ही रिक्त पदे भरण्यासाठी पालिकेने मागील कालावधीत सरळसेवा पद्धतीने जम्बो भरतीची प्रक्रिया सुरू केली होती. मात्र त्याला स्थगिती देण्यात आली आहे. परिणामी पालिकेत डॉक्टरांची वानवा असल्याने शहरातील गरीब व गरजू रुग्णांना अनेकदा उपचारासाठी खासगी रुग्णालये, दवाखान्यांमध्ये पैसे मोजावे लागतात

मीरा भाईंदर महापालिकेत स्थायी व अस्थायी डॉक्टरांची संख्या मोठ्याप्रमाणात कमी असून पालिकेची विविध आरोग्य केंद्रे ही डॉक्टरांविना सुरू आहेत. अशावेळी केंद्र परिसरातील रुग्णांना लगतच्या खासगी दवाखान्यात पैसे मोजून उपचारासाठी जावे लागते. तर तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नसल्याने शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध नाही. रुग्णांची ही गैरसोय थांबविण्यासाठी पालिकेने तत्काळ पुरेशा डॉक्टरांची नियुक्ती करून रुग्णांना दिलासा देणे आवश्यक आहे.

ओमप्रकाश गाडोदिया, माजी नगरसेवक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news