Uddhav Thackeray: ठाकरे गटात पुन्हा मोठी फूट पडणार? 7 खासदार आणि 16 आमदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचा दावा

Operation Tiger Uddhav Thackeray Krupal Tumane: शिंदे गटाचे आमदार कृपाल तुमाने यांनी ठाकरे गटातील 7 खासदार आणि 16 आमदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे.
Operation Tiger Uddhav Thackeray
Operation Tiger Uddhav ThackerayPudhari
Published on
Updated on

Operation Tiger Uddhav Thackeray Krupal Tumane: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाची चर्चा सुरू झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (ठाकरे गट) पुन्हा एकदा फुटीच्या उंबरठ्यावर असल्याचा दावा शिंदे गटातील आमदार कृपाल तुमाने यांनी केला आहे. ठाकरे गटातील सात खासदार आणि 16 आमदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असून लवकरच ते शिंदे गटात प्रवेश करतील, असा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे.

कृपाल तुमाने यांनी याला 'ऑपरेशन टायगर' असे नाव दिले असून हे ऑपरेशन अंतिम टप्प्यात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे.

'ऑपरेशन टायगर' पूर्णत्वाच्या मार्गावर?

माध्यमांशी बोलताना कृपाल तुमाने म्हणाले की, ही केवळ चर्चा नसून प्रत्यक्षात घडणारी प्रक्रिया आहे. कोणतेही ऑपरेशन करण्यापूर्वी जशी तपासणी केली जाते, त्याप्रमाणे सर्व तयारी पूर्ण झाली आहे. आता फक्त योग्य वेळ आणि मुहूर्ताची प्रतीक्षा आहे.

"रुग्णाची तपासणी झाली आहे, ऑपरेशनची तयारी पूर्ण झाली आहे. आता फक्त डॉक्टरांची अपॉइंटमेंट मिळायची आहे आणि ऑपरेशन होणार आहे," असे सूचक विधान त्यांनी केले.

ठाकरे यांच्या बैठकीला खासदारांची दांडी

काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी पक्षातील खासदारांची बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीला काही खासदार अनुपस्थित राहिल्याची चर्चा होती. याच मुद्द्यावर बोलताना कृपाल तुमाने यांनी दावा केला की, अनुपस्थित राहिलेले खासदार हेच नाराज खासदार असून ते शिंदे गटाच्या संपर्कात आहेत.

त्यांनी म्हटले की, उद्धव ठाकरे यांना स्वतःलाही या नाराजीची कल्पना आहे. त्यामुळेच पक्षात 'डॅमेज कंट्रोल' करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास

ठाकरे गटातील नेते आणि लोकप्रतिनिधी शिंदे यांच्या कार्यशैलीमुळे प्रभावित झाले असल्याचा दावाही तुमाने यांनी केला. मुख्यमंत्री म्हणून आणि सध्याचे उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी केलेल्या कामामुळे अनेक खासदार आणि आमदार त्यांच्यावर विश्वास ठेवत असल्याचे ते म्हणाले.

"कार्यकर्त्यांसाठी धावून जाणारा नेता, त्यांच्या अडचणी समजून घेणारा नेता आणि दिलेली आश्वासने पूर्ण करणारा नेता म्हणून शिंदे यांची ओळख निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक लोकप्रतिनिधी त्यांच्याकडे आकर्षित होत आहेत," असे तुमाने म्हणाले.

16 आमदारांचाही दावा

फक्त खासदारच नव्हे तर ठाकरे गटातील 16 आमदार देखील शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचा दावा कृपाल तुमाने यांनी केला आहे. आधी खासदारांचा प्रवेश होईल आणि त्यानंतर आमदारांचा प्रवेश होईल, असेही त्यांनी सूचित केले.

मात्र या संभाव्य प्रवेशाबाबत कोणत्याही नेत्याचे नाव त्यांनी उघड केले नाही. योग्य वेळी सर्व नावे समोर येतील, असे ते म्हणाले.

ठाकरे गटाची भूमिका काय?

दरम्यान, कृपाल तुमाने यांच्या दाव्यांवर ठाकरे गटाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटातील काही खासदारांच्या नाराजीच्या चर्चांमुळे या दाव्यांकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Operation Tiger Uddhav Thackeray
E100 Fuel: E100 इंधन काय आहे? पेट्रोलला पर्याय की नवा धोका? जाणून घ्या फायदे, तोटे आणि संपूर्ण गणित

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा खळबळ

2022 मध्ये एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेत मोठी फूट पडली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा ठाकरे गटातील खासदार आणि आमदार शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चेमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे.

कृपाल तुमाने यांचा दावा कितपत खरा ठरतो आणि प्रत्यक्षात किती लोकप्रतिनिधी पक्षांतर करतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news